कोयना परिसरात भूकंपाचे धक्के : केंद्रबिंदू देवरुखजवळ
रत्नागिरी: कोयना धरण परिसरात आज सकाळी 07.47 वाजता 4.8 (रिश्टर) व 8.27 वाजता (3 रिश्टरस्केल) असे दोन भूंकपाचे धक्के जाणवले. सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याला बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांचा केंद्र बिंदू रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख पासून सात किलोमीटर अंतरावर होता, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भारतीय हवामान केंद्राच्या रत्नागिरीतील पवन गुब्बारा केंद्रास भेट देवून माहिती घेतली.
कोयना परिसरास सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी 4.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप नोंदला गेला तर त्यानंतर लगेचच सकाळी 08.27 वाजता 3 रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भारतीय हवामान विभागाच्या निरिक्षण केंद्रास सकाळी 11 वाजता भेट देवून येथील उपलब्ध असणाऱ्या विविध यंत्रणांची माहिती घेतली.
रत्नागिरी हवामान निरीक्षण केंद्रातर्फे माहिती संकलीत करण्याची पध्दत आणि त्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा, हायड्रोजन बलून प्रणाली, पर्जन्यमान मोजण्याची व्यवस्था आणि त्याची यंत्र प्रणाली आणि हवेतील आर्द्रता मोजण्याची यंत्रणा आदिविषयक माहिती त्यांनी जाणून घेतली.
रत्नागिरी येथे 30 वर्षापासून हे केंद्र कार्यरत आहे. या केंद्रास 30 वर्षात भेट देणारे हे पहिलेच जिल्हाधिकारी आहेत.