कारंजा-उरण नौदल तळावर 2 मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
उरण, 21 जुलै : पश्चिम नौदल कमांडच्या पहिल्या 2 मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ई-उद्घाटन व्हाईस अॅडमिरल अजित कुमार, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्या हस्ते सोमवारी, दि. 20 जुलै, 2020 रोजी करण्यात आले.
कारंजा-उरण इथल्या नौदल तळावर हा प्रकल्प स्थापित करण्यात आला आहे. या विभागातला हा सर्वात मोठा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. हा प्रकल्प 100 टक्के स्वदेशी आहे. यासाठी वापरण्यात आलेले पॅनल स्वदेशामध्ये विकसित करण्यात आले आहेत. तसेच ट्रॅकिंग टेबल्स आणि इन्व्हर्टरही स्वदेशी बनावटीचे वापरण्यात आले आहेत. सूर्याच्या बदलत्या दिशेबरोबर सौर पॅनल्सची सांगड घालून, संगणकाच्या मदतीने परीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी ग्रिड एकमेकांना जोडण्यात आले आहेत.
या सौर प्रकल्पामुळे कारंजा-उरण नौदल स्थानकाची वीजेची आवश्यकता पूर्ण होवू शकणार आहे. अक्षय, नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोताचा पूर्णपणे वापर करण्याच्या दिशेने भारतीय नौदलाने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे.