मुंबईला लवकरच मिळणार ८ किमी लांबीचे सायकल ट्रॅक : पालिका आयुक्तांची ग्वाही
मुंबई : मुंबई शहराची पहिली वहिली “वॉकेबल सिटीज मुंबई परिषद” वॉकिंग प्रोजेक्ट या २०१२ पासून कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने आज वाय. बी. चव्हाण केंद्रात नुकतीच पार पडली. या कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुणे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री भूषण गगराणी यांनी सांगितले की मे अखेरपर्यंत मुंबईमध्ये एकंदर सुमारे ८ किलोमीटर लांबीचे स्वतंत्र सायकल ट्रॅक नागरिकांना उपलब्ध करून दिले जातील.
“मुंबईला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय व्यवस्थेची अजूनही कमतरता आहे. शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये पादचारी सुविधा खूपच कमी आहेत. तसेच सध्या मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचा विस्तार, अटल सेतु सारख्या मोठ्या पायाभूत सेवा निर्माण केल्या जात असल्याने नागरिकांना रस्त्यात चालण्यात समस्या येत आहेत. परंतु त्या सुधारण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत,” गगराणी म्हणाले.
या परिषदेत सार्वजनिक धोरण तज्ञ, नागरी आराखडा आणि स्थापत्यविशारद, तसेच शास्त्रज्ञ आणि अभ्यासक यांची मुंबईमधील पादचारी सुविधा आणि पर्यावरणीय व्यवस्था सुधारण्यासाठी विविध स्तरांवर खाजगी आणि सरकारी माध्यमातून कोणते उपाय योजावे लागतील यावर विस्तृत चर्चासत्रे पर पडली.
वॉकिंग प्रोजेक्ट चे अध्यक्ष आणि सल्लागार आणि सनविन या कंपनीचे सीईओ श्री संदीप बजोरिया यांनी कार्यक्रमाचा हेतु आणि सूत्र मांडताना सांगितले की मुंबईकरांना चांगल्या आणि आरोग्यदायी नागरी सुविधा देण्यासाठी आम्ही सरकारी यंत्रणा, महापालिका तसेच खाजगी संस्थांबरोबर अत्यंत सकारात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनातून कार्य करीत राहू.
यावेळी मुंबईच्या नागरी विकासात मोलाचे सहकार्य केलेल्या आमला रुईया, डॉ मंजू लोढा, डॉ रती गोदरेज, मयांक गांधी, रमेश आणि पवन पोददार, प्रदीप खेरुका, सुशील जीवराजका, आनंदिनी ठाकूर, अजय अग्रवाल आदींचा सत्कार करण्यात आला. लोकमत समूहाचे श्री ऋषि दर्डा आणि बांधकाम व्यावसायिक श्री निरंजन हिरानंदानी यांचा देखील सत्कार करण्यात आला परंतु काही कारणांनी ते अनुपस्थित राहिले.
परिषदेतील पाहुण्यांची काही मते :
श्री प्रदीप खेरुका, अध्यक्ष, बोरोसिल रिन्युएबल्स:
“सरकारकडून काही होण्याची वाट पाहू नका. मुंबईसाठी आवश्यक पादचारी मार्ग (walkways) आता सरकारच्या मदतीशिवायही तयार झाले पाहिजेत. असे मार्ग शोधा आणि ते विकसित करण्यासाठी सर्वांनी पुढे या!”
श्री सुशील जिवराजका, उद्योजक
“ब्रीच कँडीमध्ये दिवसेंदिवस फुटपाथ संकुचित होत आहेत, फरशी आणि पेव्हर ब्लॉक ची अवस्था अत्यंत वाईट आहे. १०० मीटर नीट चालणे शक्य नाही. त्यातच किरकोळ विक्रेते, फेरीवाले, व्यसनाधीन लोक यांनी उरलेली जागा व्यापलेली दिसते, त्यामुळे चालण्याचा विचारही करता येत नाही.” या पार्श्वभूमीवर “आपण ‘वॉक द टॉक’ करण्याऐवजी ‘टॉक द वॉक’ करायला हवे.”
श्री ऋषि अग्रवाल, सीईओ, संयोजक
”हवामान बदलासंबंधी मुद्दे वादग्रस्त ठरू शकतात, पण चालण्यायोग्य शहर ही संकल्पना सर्वांसाठी स्वीकारार्ह आहे. चालण्यायोग्यता (वॉकेबिलिटी) सर्व भागधारकांना कोणत्याही अडचणीशिवाय सहज एकत्र आणू शकते तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा हेतु सध्या करते. चालण्यायोग्य शहरे ही आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे.
श्री फिटनेस तज्ञ श्री मिकी मेहता:
बॉलीवूड मधील उदाहरण घेतले तर शोले चित्रपटात गब्बरने बसंतीला सांगितले होते, जो पर्यंत तुझे पाय चालतील, तोपर्यंत तुझा श्वास चालेल. पाय थांबले, तर जीवन थांबेल.’ हा संदेश आजच्या काळात चालण्याच्या गरजेवर लागू होतो. चांगले चालणे आवश्यक आहे आरोग्यदायी देखील आहे”
श्री भूषण गगराणी, मुंबई महापालिका आयुक्त
“आपल्या व्यवस्थेमध्ये राजकीय मदत आणि इच्छाशक्तीशिवाय काहीही शक्य होत नाही. 40% मुंबई ही पुनर्प्राप्त (reclaimed) जमीन आहे, विशेषतः मध्य मुंबई. त्यामुळे पावसाळ्यात समस्यांचे प्रमाण अधिक असते. मुंबईतील रस्ते अद्याप आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाहीत, पण आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण गरजेचे आहे, जरी त्यामुळे काही काळ चालण्याला त्रास होत असला तरीही. चालण्याचा अनुभव उपयोगी, सुरक्षित, आरामदायक असला पाहिजे, यासाठी निधी उपलब्ध केला जात आहे. तसेच पर्यावरण रक्षणासाठी नाल्यांच्या कडेला बांबूची लागवड केली जात आहे, याचा चालणाऱ्या नागरिकांना फायदा होईल.”
मयांक गांधी: “मी महिन्याचा अर्धा वेळ गावी राहतो, पण जेव्हा मुंबईत असतो, तेव्हा एस.व्ही. रोडवरील फुटपाथ सर्वात भयानक वाटतात. जो कोणी ते सुधारण्यासाठी काम करेल, मी त्याला मदत करीन.”
पादचाऱ्यांसाठी अधिक अनुकूल मुंबई करण्याचा संकल्प
ही परिषद मुंबईतील पादचारी सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजना यावरील चर्चा आणि अंमलबजावणीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली. ही परिषद मुंबईला अधिक चालण्यायोग्य आणि सायकलस्नेही शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे