देवनार, गोवंडी, शिवाजी नगर, भागात प्रदूषणात वाढ; खासदार संजय दिना पाटील आक्रमक, कारवाई करण्याची मागणी
अनधिकृत आरएमसी प्लांटवर जाणीवपुर्वक कारवाई केली जात नाही – खा. संजय दिना पाटील
मुंबई, दि.२३ (प्रतिनिधी) – देवनार, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, परिसरात प्रदूषणाची समस्या कायम आहे. मुंबईतील अनेक भागातील हवेची गुणवत्ता खराब झाली असून पालिकेच्यावतिने करण्यात येणा-या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. देवनार मध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली असून शुष्क वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या भागात असलेले डंम्पिंग तसेच अनधिकृत चालणारे आरएमसी प्लांट याला जबाबदार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र पालिकेचे अधिकारी जाणीवपुर्वक या अनधिकृत आरएमसी प्लांटवर कारवाई करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
इंडिया क्रियेट आरएमसी गोवंडी, डायनामाईक आरएमसी देवनार, आरडीसी कॉंक्रीट आरएमसी व श्री सिमेंट आरएमसी गोवंडी हे सर्व आरएमसी प्लांट कायद्याचे उल्लंघन करीत अनधिकृतपणे चालू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार आरएमसी प्लांट लोकवस्तीपासून दूर असायला हवे. मात्र तसे न झाल्याने या प्लांटमुळे देवनार, शिवाजी नगर, गोवंडी तसेच मानखुर्द भागात प्रदूषण वाढले आहे. सिमेंट, धुळीमुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचे त्रास होत असून शिवाय पावसाळ्यात नाल्यामध्ये गाळ जमा झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे आरएमसी प्लांटबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारीनुसार खासदार संजय दिना पाटील यांनी १९ जून २०२४ रोजी एम पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करुन हे सर्व प्लांट बंद करण्याबाबत विनंती केली होती. तरीही हा प्लांट बंद करण्यात आला नाही. त्यानंतर १४ जानेवारी २०२५ रोजी पालिका आयुक्यांना या प्लांटबाबत लेखी तक्रार देउन हे प्लांट बंद करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र एक महिना ओलांडल्यानंतर ही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. पालिकेच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे या भागात प्रदूषणात वाढ झाली असून पालिका अधिकारी हे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले.