अभियानात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी संस्थांचाही (NGO) सहभाग*
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील वृक्षांच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेचे ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ सुरू झाले आहे. मुंबईतील वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. झाडांवर खोचलेले फलक, खिळे, केबल्स काढण्यात येत आहे. दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. या अभियानात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मुंबईतील स्वयंसेवी संस्था (NGO) सहभागी झाल्या आहेत.
मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे अभियान हाती घेतले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील वृक्षांचे आरोग्य सुधारावे, त्यांची वाढ व्हावी, जोपासना व्हावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार आणि उप आयुक्त (उद्याने) श्री. अजीत आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे.
महानगरपालिकेने सन २०२२ मध्ये सर्वप्रथम हे अभियान हाती घेतले होते. पहिल्या टप्प्यात हे अभियान अत्यंत यशस्वी झाले होते. त्यामुळे आता अभियानाचा पुढचा टप्पा हाती घेण्यात आला आहे. या अभियानात वृक्षांवरील खिळे, जाहिरातीचे बॅनर / पोस्टर्स, वायर्सचे जंजाळ, वृक्षांच्या मुळाशी झालेले काँक्रिटीकरण काढून टाकण्यात येत आहे. तसेच झाडांभोवतीचे सिमेंट काढल्यानंतर तेथे लाल मातीचा थर दिला जात आहे. त्यानंतर झाडांना पुरेसे पाणी टाकले जात आहे.
मुंबईकरांमध्ये या अभियानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती अभियानात उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था (NGO) देखील सहभागी झाल्या आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड ऑफिस ) रस्त्यालगतच्या वृक्षांवर नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.