वाघ मृत्यू आणि वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात : डॉ. परिणय फुके
मुंबई : राज्यातील वाघ मृत्यू आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना वन विभागाने कराव्यात, असे निर्देश वन राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिले.
राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात वने विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वने विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वने विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या संख्याबळाचा आढावा घेवून वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टिने वने सरंक्षकाच्या संख्येत वाढ करणे आवश्यक असून त्यादृष्टीने विभागाने नियोजन करावे. वन्य प्राण्यांची अवैद्य शिकार रोखण्याच्या दृष्टिने पोलीस पाटील यंत्रणेचा सहभाग करुन घेणे, वैज्ञानिक व्यवस्थापनाच्या कारणास्तव नारा वन क्षेत्रातील 200 चितळ अंबाझरी 100 व पवणी 100 या वनपरिक्षेत्रामध्ये हलविणे, नवेगाव व नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या वाढविण्याविषय विविध उपाययोजनांचा आराखडा तयार करुन त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देशही राज्यमंत्री डॉ. फुके यांनी यावेळी दिले.
डॉ. फुके यांनी यावेळी सांगितले, वन परिक्षेत्रामध्ये राहणारी बहुतांश लोकसंख्या ही आदिवासी असल्यामुळे आवश्यकता असल्यास वन विभाग आणि आदिवासी विकास यांनी एकत्रितपणे योजना राबविणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने वन विभागाने प्रयत्न करावे. वन परिक्षेत्रांमधील रहिवाशांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावेत.