पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणीची सुरुवात स्वत:पासून करा : विनोद तावडे; न्यूयॉर्कच्या सिटी विद्यापीठाचे विद्यार्थी भारत दौऱ्यावर
मुंबई : शाश्वत जीवन पद्धतीचा अभ्यास करत असताना, कच-यापासून पर्यावरणपूरक प्रकल्प बनविण्याचा प्रयत्न आपल्या घरापासून करा. तेव्हाच ख-या अर्थाने आपण त्याची अंमलबजावणी करू असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी न्युयॉर्क येथील सिटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सांगितले.
आज मंत्रालयात न्युयॉर्क येथील सिटी विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. या शिष्टमंडळात विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. नेल फिलीप्स, डॉ. ड्रेक स्कीट, प्राध्यापिका पोरोमिता सेन, ऑस्ट्रेलियाच्या शासनाचे प्रतिनिधी ग्रेक ग्रुस यासह विज्ञान, पर्यावरण,मानवी सेवा, अभियंता अशा विविध विषयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, भारतात विविध संस्कृतीचे जतन केले जाते आणि विविध भाषा बोलणारे लोक आहेत. पूर्वापार निसर्गाचा जास्तीत जास्त वापर करून निसर्गाचे जतन करण्याची पद्धती येथे आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे त्यात बदल होत आहेत. राज्यातील शिक्षणपद्धती,राजकारण आणि बॉलीवूड संदर्भात तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतातील पर्यावरण पूरक आणि कच-यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रकल्प निर्मितीची अंमलबजावणी करा असेही तावडे यांनी यावेळी चेर्चेदरम्यान सांगितले.
परदेशी अभ्यास कार्यक्रमांतर्गत हे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया, स्पेन नंतर भारत दौ-यावर आहे. पर्यावरणाचा अभ्यास व संरक्षण, कच-यापासून खतांची निर्मिती, सौरऊर्जा, सेंद्रीय खते,योगा आदीवर चालणारे जीवनमान या विषयांवर ते पालघर येथील गोवर्धन इको गावात राहून अभ्यास करीत आहेत. या शिष्टमंडळाने भारतातील गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी २५ हजार रूपये इतकी आर्थिक मदत केली आहे. याचबरोबर गोवर्धन गावात सीयुएनवाय मार्फत वेदर स्टेशन बॉक्स प्रदान करण्यात आले आहे.