जंगलातल्या वणव्यांचा प्रभावी मुकाबला करण्याच्या दृष्टीने ओडिशा सरकारच्या सहाय्याकरिता केंद्र सरकारकडून तज्ञ पथक
नवी दिल्ली : ओदिशामध्ये वणव्याच्या अभूतपूर्व घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ओदिशा सरकारला सहाय्य करण्यासाठी त्रि सदस्यीय तज्ञ पथक स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला आहे.
हे पथक लवकरच ओदिशाला जाणार असून वणवे लवकर आणि प्रभावी पद्धतीने शमवण्यासाठी तंत्रविषयक तज्ञ सल्ला देण्याबरोबरच आवश्यक सहाय्यही करणार आहे. प्रकाश जावडेकर यांनी आज ट्वीट संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे.
वणव्यांच्या घटना थांबून परिस्थिती सुरळीत होईपर्यंत हे पथक राज्यासमवेत काम करणार आहे. या पथका बरोबरच संपूर्ण ओदिशातल्या वनातले वणवे दर्शवणाऱ्या नकाशावर आपण स्वतः दररोज लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सिमिलीपाल व्याघ्र अभयारण्य आणि जैव अभयारण्य इथल्या आगीच्या घटना दर्शवणाऱ्या वेगळ्या नकाशावरही लक्ष ठेवणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले आहे.