विक्रोळीतील विद्या विकास एज्युकेशन संस्थेच्या आवारात वृक्ष संगोपनाचा स्तुत्य उपक्रम; पर्यावरण रक्षणासाठी संस्थेची भक्कम भूमिका
मुंबई, ५ जून (जागतिक पर्यावरण दिन) — विक्रोळी कन्नमवार नगर येथील विद्या विकास एज्युकेशन संस्था पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत वृक्ष संगोपनाचा उपक्रम राबवत आहे, जो आजच्या काळात अनुकरणीय ठरला आहे.
संस्थेच्या परिसरात सध्या ४० पेक्षा अधिक विविध जातींची झाडे नित्य फुलत आहेत. नारळ, फणस, आंबा, शेंगा यांसारखी उपयुक्त फळझाडे तसेच गुलाब, मोगरा यांसारखी सुगंधी फुलझाडे प्रसन्न – शांत व स्वच्छ निसर्गसंपन्न वातावरण निर्माण करत आहेत. संस्थेने वृक्षसंवर्धनासाठी नियमित देखरेख व काळजीपूर्वक उपाययोजना केल्या आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरणीय जबाबदारी रुजवण्याचा हेतू :
संस्थेचे सचिव विनय राऊत यांनी याबाबत सांगितले की,
” विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय भान निर्माण होणे आवश्यक आहे. वृक्ष संगोपनाच्या माध्यमातून निसर्गप्रेम आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना आम्ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहोत.”
संस्थेची पर्यावरण रक्षणासाठीची आगामी योजना
विद्या विकास एज्युकेशन संस्थेने आगामी काळात १०० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला. औषधी वनस्पती, डेरेदार वृक्ष तसेच पर्यावरणपूरक प्रजातींचा समावेश असेल. पावसाचे पाणी साठवण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प आणि सेंद्रिय खत निर्मिती, सौर उर्जा या सारखे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
पर्यावरण संवर्धन कशा प्रकारे करावे हे संस्थेने कृतीतून दाखवून दिले आहे. इतर संस्थानी असे अनुकरण करून वृक्ष संगोपन करावे, अशी प्रतिक्रिया परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी दिली.