मालाड, ता.8(वार्ताहर) : 8 जुन हा दिवस जागतिक महासागर दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे, असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन,अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते.
याच अनुषंगाने रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा , भारतीय तटरक्षक दल रत्नागिरी व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने युट्युब लाईव्ह कार्यक्रमाद्वारे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ‘’ जीवन आणि उदरनिर्वाह ” या विषयी डॉ. अभय बी. फुलके, वरिष्ठ वैज्ञानीक, सूक्ष्मजीवविज्ञान विभाग, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, प्रादेशिक केंद्र, अंधेरी, मुंबई यांनी मार्गदर्शन केले . डॉ. अभय बी. फुलके यांनी जागतिक महासागर दिनानिमित्त जीवन व उपजीविका, सागराचे महत्व, महासागराचे प्रदूषण व उपाय, तसेच मत्स्यासाठा कमी होण्याचा नैसर्गिक कारण या विषयी व स्वत: स्वयंसेवक होऊन कश्या पद्धतीने हे आपण प्रदूषण थांबवू शकतो, यावर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे के. एल. अरुण, डी.आय.जी, स्टेशन कमांडर, कोस्ट गार्ड स्टेशन रत्नागिरी यांनी जागतिक महासागर दिनाचे महत्व पटवून दिले तसेच 2021ते2030 हे कालावधी परिसंस्था पुंरूज्जीवन दशक आहे हे व ते घडवणे किती आवश्यक आहे हे संगितले, भारतीय तटरक्षक दल आणि मासेमार यांचे नाते कशाप्रकारे एकमेकांशी जोडले गेले आहे याची माहिती दिली . त्याचप्रमाणे भारतीय तटरक्षक दलाकडून सागरी सुरक्षेची साधने व त्याचा योग्य उपयोग याचे सादरीकरण केले. के एल अरुण यांनी भारतीय तटरक्षक दल नेहमीच मासेमारांच्या सुरक्षेसाठी तत्पर असल्याची माहिती दिली. कार्यक्रमध्ये कोकण किनारपट्टीवर मासेमार बंधू भगिनीने कार्यक्रमात सहभाग नोंदवला व तसेच त्यांचे मासेमारी विषयी प्रश्न, समुद्रामध्ये प्लॅस्टिक व सिवेज न जाण्यासाठी काय करावे, तसेच नाल्यात सिवेज ट्रीटमेंट प्लांट संबंधित तसेच स्वयंसेवक होऊन कश्यापद्धतिने समुद्र स्वच्छ ठेवू शकतो, असे प्रश्न विचारण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक रिलायन्स फाउंडेशनचे महाराष्ट्र गोवा छत्तीसगढ राज्य समन्वयक दीपक केकाण यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिलायन्स फाउंडेशनचे मुंबई पालघर रायगड चे व्यवस्थापक तेजस डोंगरीकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रिलायन्स फाउंडेशनचे रत्नागिरी सिंधुदुर्ग व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी केले . कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक गणपत गावडे, चिन्मय साळवी , निरंजन घुले व योगेश मेंदडकर यांनी केले.