मुंबई, 23 जून : रेल्वे स्थानक आणि त्यांच्या आसपासच नाही तर रेल्वे रुळांवरही स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेने सातत्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. मध्य रेल्वेचे मुंबई उपनगरी रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे, ज्यामध्ये ३३६ रूट किमी चे पाच रेल्वे मार्ग आहेत. शहराचा ट्रॅक स्वच्छ ठेवण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान व हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यान कचरा काढण्यासाठी आणि कचरा गोळा करण्यासाठी ‘स्वच्छता रथ’ चालवते. गेल्या १२ महिन्यांत ९५,००० घनमीटर कचरा ट्रॅकवरून साफ केला गेला.
ट्रॅकच्या आजूबाजूला टाकण्यात येणारी घाण आणि कच-यामुळे केवळ रेल्वे ट्रॅक घाणेरडे दिसत नाही तर त्याखालील गटारांत ही घाण अडकते ज्यामुळे पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचते. नेहमी रेल्वे सेवा कमी असताना मध्यरात्री हे रथ चालत असत, पण आता लॉकडाऊनचा फायदा घेत मध्य रेल्वेने दिवसाही हे स्वच्छता रथ चालवले. घाण आणि कचरा साफ केल्यावर गोणींत भरले जाते त्या नंतर ‘स्वच्छता रथ’ स्पेशल ट्रेनमध्ये या गोणी भरल्या जातात. मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर प्रत्येकी एक याप्रमाणे मध्य रेल्वे दोन ईएमयू ‘स्वच्छता रथ’ गाड्या चालवत आहे. या व्यतिरिक्त, जेव्हा आवश्यक असते तेव्हा, जेव्हा जेव्हा जेसीबी मशीनच्या सहाय्याने घाण/गाळ ( मक) काढला जातो तेव्हा, 3 बीआरएन (फ्लॅट प्रकारचे वॅगन) ऑपरेट केले जातात, .
‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) चे अँकर अमिताभ बच्चन यांनी मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रकाश बाबा आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांना २५ लाख रुपयांच्या बक्षिसासाठी ‘मक स्पेशल ट्रेन’ बद्दल प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर त्यांनी यशस्वीरित्या दिले होते, तेव्हा ‘स्वच्छता रथ’ लोकप्रिय झाला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण दरम्यान पारसिक बोगद्याजवळील दोन्ही बाजूंच्या झोपड्या / झोपडपट्ट्या, डोंबिवली स्टेशनच्या स्लो मार्गावरील मुंबई दिशेकडील टोक, विक्रोळी, माटुंगा- शीव दरम्यान धोबी घाट व धारावी तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मस्जिद – सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान ‘स्वच्छता रथ’ मुख्यतः वापरले जाते. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यान, वडाळा आणि किंग्ज सर्कल, माहीम, चेंबूर आणि मानखुर्द दरम्यान, गुरु तेग बहादूर नगर आणि रावली सेक्शन दरम्यान रावली जंक्शन येथेही स्वच्छता रथ’ वापरले जातात.
रेल्वे रुळांवर कचरा टाकू नये, असे जनतेला रेल्वे आवाहन करीत असले तरीही ‘स्वच्छता रथ’ गाड्या चालवून मुंबईकरांना स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी मध्य रेल्वेचा सातत्याने प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.