दापोलीतील मौजे आंजर्ले, मंडणगडमधील मौजे वेळास समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा निर्णय
वारसा स्थळ घोषित केल्यास जैवविविधता ऱ्हास रोखण्यास मदत –जिल्हाधिकारी
रत्नागिरी, दि. 21 (जिमाका) : जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा व मानवी कल्याणाशी निगडीत असल्याने या स्थळांची नोंद घेऊन, त्या स्थळांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यास जलदरितीने जैवविविधतेचा होणारा ऱ्हास रोखण्यास मदत होणार आहे, असे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जिल्हास्तरीय जैविक विविधता व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर यांच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील मौजे आंजर्ले, ता. दापोली व मौजे वेळास, ता. मंडणगड येथील समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, ऑलिव्ह रिडले कासवांच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती होवून, कासवांचे संवर्धन व संरक्षण होण्यास मदत होवून पर्यटनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होईल. मौजे आंजर्ले व मौजे वेळास या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर, ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही शीघ्रगतीने व समितीच्या मंजुरीने करण्यात येईल.
बैठकीमध्ये जिल्ह्यातील आंजर्ले, ता. दापोली व वेळास, ता. मंडणगड येथील समुद्र किनारे ऑलिव्ह रिडले कासावांकरिता प्रसिध्द असून त्यांचे संवर्धन करण्याचे महत्त्व दर्शविणारे सादरीकरण विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांनी केले.