मढच्या समुद्रात डॉल्फिन्सचे ‘सूर’..पहा मनमोहक व्हिडिओ..
मुंबई, 6 जुलै (निसार अली) : लॉकडाऊनचा पर्यावरणावर चांगला परिणाम होताना दिसत आहे. समुद्र किनाऱ्याजवळील
पाण्यातील प्रदूषणात घट होत आहे. आज याचा प्रत्यय आला.
कारण मढच्या समुद्र किनाऱ्यापासून कमी अंतरावर पाण्यात डॉल्फिन या माशांचे दर्शन झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी समुद्रातून हवेत सूर मारणाऱ्या अंदाजे 6 माशांचे चित्रण मोबाईल मध्ये केलं आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या मढ या गावातील ग्रामस्थ महेश बोटे म्हणाले की आज सकाळी साडेसातच्या सुमारास सिल्व्हर बीचवर फेरफटका मारण्यासाठी गेलो असता मलाही डॉल्फिन दिसले. त्यांचे मनमोहक दृश्य मी मोबाईलमध्ये टिपले.
तर अजून एक ग्रामस्थ डॉक्टर नेक्सन नाटके म्हणाले की, मढ़ किल्ल्याच्या मागे काही वर्षांपूर्वी डॉल्फिन दिसले होते. आता लॉक डाउन मुळे समुद्रात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा डॉल्फिन दिसू लागले आहेत.
डॉल्फिन विषयी माहिती :
डॉल्फिन या माश्यांचा समावेश सस्तन सागरी प्राण्यांत होतो.
डॉल्फिनला बुद्धिमान समजले जाते. शिकविल्यास अनेक गोष्टी तो शिकतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत सागरात ते आढळतात. डॉल्फिन ध्वनी निर्माण करतात. या ध्वनींच्या प्रतिध्वनीमुळे त्यांना मार्गात येणारे अडथळे समजतात. डॉल्फिन हे स्वच्छ आणि ऑक्सिजनची मात्रा असलेल्या ठिकाणी मार्गक्रमण करतात.
लॉकडाऊनमुळे समुद्रात ऑक्सिजनची पातळी वाढली का?
मुंबईतील प्रदूषित समुद्रात लॉकडाऊनमुळे ऑक्सिजनची पातळी वाढली आहे का? समुद्र स्वच्छ होत आहे का? याचे उत्तर आता सागर अभ्यासकांना शोधावे लागणार आहे. समुद्रात जैवरासायनिक पदार्थांच्या विघटनाचे गंभीर परिणाम होत असतात. पाण्यात मिसळलेल्या ऑक्सिजनच्या प्रमाणात घट होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यावर अवलंबून असणारे जीव श्वास घेऊ शकत नाही आणि मरण पावतात. किनाऱ्याजवळील भागातील पाण्यात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड असते. आज समुद्र किनाऱ्याजवळ पाण्यात डॉल्फिन दिसल्याने समुद्री प्रदूषणात घट होत आहे, याबाबत संशोधन होणे गरजेचे बनले आहे.