प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवली 40 व्या क्रमांकावर; प्रदूषण रोखण्यासाठी राजेश मोरे यांचे पर्यावरण मंत्र्यांना साकडे
डोंबिवलीत गेल्या काही दिवसात प्रदूषणाचा तक्रारीत वाढ झाल्याने एमपीसीबीकडे माहिती अधिकारात माहिती विचारण्यात आली होती. प्रदूषण करणाऱ्या किती कंपन्या बंद करण्यात आल्या व त्यांची नावे अशी माहिती घेण्यात आली होती. त्यामध्ये सन – 2016 पासून आजतागायत 89 कंपन्या बंद करण्याचा नोटीस देण्यात आल्या आहेत. याबाबत एमपीसीबीचे अधिकारी भोसले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
डोंबिवलीतील प्रदूषण समस्येबाबत शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे यांनी पर्यावरण
मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, याविषयी जनआंदोलनेही केली आहेत. औद्योगिक विभागातील केमिकल कंपन्यामुळे प्रदूषण होत आहे. ‘कामा संघटना’ आणि एमआयडीसी अधिकारी यांचे कंपनी मालक व व्यवस्थापनाशी संगनमत असल्याने प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत असून त्याचा नागरीकांच्या आरोग्यास धोका होत आहे. यामुळे डोंबिवलीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे ऑफिस असणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणीही मोरे यांनी पत्रात केली आहे.
मात्र कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले, आम्ही प्रदूषण कमी होण्यासाठी झटत असून औद्योगिक विभाग आणि निवासी विभाग यामध्ये अंतर पाहिजे होते असे सांगितले.
देशातील प्रदूषित शहरांचा यादीत महाराष्ट्रातील तारापूर, चंद्रपूर, औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई ही सहा शहरे असून त्यात डोंबिवली हे शहर चाळीसाव्या क्रमांकावर आहे. डोंबिवलीचा सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण दर्शक 69.67 इतका आहे. साधारण प्रदूषण दर्शक 60 वरील असल्यास ते शहर चिंताजनक पातळी वर असल्याचे प्रमाण मानले जाते. डोंबिवलीतील हवा आणि पाणी याचेही प्रदूषण प्रमाण अनुक्रमे 62 व 63.5 इतके आहे. डोंबिवलीतील प्रदूषणाची पातळीत वाढ होण्याला औद्योगिक कारखाने या बरोबर शहरातील बांधकामे, वाहने ट्रॅफिक, अस्वच्छता इत्यादी अनेक कारणे असू शकतात.