फुल पीक योजनेच्या लाभातून फुलवा फुलशेती
मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग
कोकण विभाग म्हणजे आंबा, काजू सारख्या फळपिकांचे आगार समजले जाते. त्याचबरोबर आता त्याच्या जोडीला कोकणातील शेतकऱ्यांना फुल पिकांच्या शेतीमध्येही चांगले उत्पन्न मिळवू लागले आहे. कोकणात विशेषतः ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोगरा, निशिगंध, गुलाब व सोनचाफा या फुलपिकांचे उत्पादन घेतले जात आहे. अजूनही कोकणात फुलपिकांच्या उत्पादनाला मोठा वाव आहे. फुलपिकांची शेतीसाठी राज्य शासनाने हातभार लावला असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत फुलपीक लागवडीसाठी अनुदान देण्याची योजना राबवित आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन फुलपिकाच्या शेतीमध्ये प्रगती करावी.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग वृक्ष जन्य वन पिके मसाला पिके व फुल पिके अशा विविध पिकांसाठी एक वर्ष ते तीन वर्ष अनुदान तत्वावर शासकीय योजना कार्यान्वित आहे. दि.३० मार्च २०२२ च्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतजमिनीवर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर फुलपिके लागवड कार्यक्रम राबविण्यास आणि तांत्रिक व प्रशासकीय मान्यताबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. दि.१५ डिसेंबर, २०२२ च्या शासन निर्णयानुसार द्राक्ष, केळी, ड्रॅगनफ्रुट आणि मसाला पिके तसेच गुलाब, मोगरा, निशिगंध, व सोनचाफा या चार फुलपिकांचा समावेश करून आणि या पिकांचे आर्थिक मापदंडास मान्यता प्राप्त आहे.
योजनेचे मुख्य उदिष्ट :- फुलपिकांचे उत्पादनात वाढीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होवून निर्यातीस चालना मिळण्यास मदत होईल.
v अनुदेय फुलपिके :- मोगरा, निशिगंध, गुलाब व सोनचाफा.
v मोगरा :- योजनेंतर्गत झालेले फुलपीक लागवड क्षेत्र – १७२.९२. आर्थिक (हे) मापदंड लाभ रु.२७६७५०/-.
v निशिगंध :- योजनेंतर्गत झालेले फुलपीक लागवड क्षेत्र – ०.१०. आर्थिक (हे) मापदंड लाभ रु. ३२१४६१/-.
v गुलाब :- योजनेंतर्गत झालेले फुलपीक लागवड क्षेत्र – २.३०. आर्थिक (हे) मापदंड लाभ रु. ३६१४५०/-
v सोनचाफा :- योजनेंतर्गत झालेले फुलपीक लागवड क्षेत्र – २.९३. आर्थिक (हे) मापदंड लाभ रु. २३०८६०/-.असे एकूण योजनेंतर्गत झालेले फुलपीक लागवड क्षेत्र – १७८.२५. आर्थिक (हे) मापदंड लाभ रु.११९०५२१/-.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, पालघर जिल्ह्यातील वसई-विरार, पालघर, रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत इत्यादी तालुक्यात तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोगरा, निशिगंध, गुलाब व सोनचाफा या फुलपिकांचे उत्पादन घेतले जाते.
- कोकण विभागात फुलपिक लागवडीसाठी पुरेसा वाव आहे.
- फुलपिकांसाठी एक वर्षात संपूर्ण अनुदान देय आहे.
- या योजनेत लागवडीसाठी कमीतकमी०.०५ हे. व जास्तीतजास्त २.० हे. प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा आहे.
यासाठी म.गांधी रा.ग्रा.रो.ह.योजनेचे जॉब कार्ड, ७/१२ उतारा, ८-अ, योजनेसाठी अर्ज व संयुक्त खातेदार असल्यास संमती पत्र, बँक पासबुकची छायांकित प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
ही लागवड अत्यंत फायदेशीर असून एकाच वर्षानंतर फुल पिकाचे उत्पादन सुरू होऊन मुंबईसारखी बाजारपेठ जवळ असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. पिकांचे उत्पादन हे जवळपास बारमाही असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यासाठी महत्त्वाचे आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, उरण, पनवेल, अलिबाग, रोहा, आणि इतरही तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.