कचरा मुक्त तास (गार्बेज फ्री आवर) मोहिमेस मुंबई महानगरात प्रारंभ
बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी ६४ मेट्रिक टन कच-याचे संकलन
१ हजार ४३९ कामगार, कर्मचा-यांची १५३ संयंत्रांच्या सहाय्याने अविरत कामगिरी
Mumbai : स्वच्छतेची पातळी उंचावणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जागरूकता निर्माण करणे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘कचरा मुक्त तास’ मोहीम हाती घेतली आहे. आज (दिनांक १५ जानेवारी २०२५) संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रात म्हणजे सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड) सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या दोन तासांच्या कालावधीत ‘कचरा मुक्त तास’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी आज ६४ मेट्रिक टन कचरा संकलन करत त्याची विल्हेवाट लावण्यात आली. सुमारे १ हजार ४३९ कामगार, कर्मचा-यांनी १५३ संयंत्रांच्या सहाय्याने ही कामगिरी केली. ‘कचरा मुक्त तास’ मोहिमेत नागरिकांनी व सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ‘क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा’ जाहीर केला आहे. त्यात स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. या अंतर्गत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी प्रत्येक प्रशासकीय विभागात (वॉर्ड) व्यापक स्वच्छतेसाठी सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या दोन तास कालावधीत ‘कचरा मुक्त तास’ (गार्बेज फ्री आवर) मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील तयार करण्यात आली आहे.
या मोहिमेचा शुभारंभ आज (दिनांक १५ जानेवारी २०२५) सकाळी ११ वाजता सर्व प्रशासकीय विभागात एकाचवेळी करण्यात आला. परिमंडळ उप आयुक्त आणि सहायक आयुक्त यांच्या देखरेखीखाली विविध रेल्वे स्थानक परिसर (पूर्व आणि पश्चिम), धार्मिक स्थळे, बाजारपेठा, वाणिज्यिक क्षेत्र, पर्यटन स्थळे, खाऊ गल्ल्या आणि वर्दळीच्या ठिकाणी सामूहिक स्वच्छता करण्यात आली.
महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या या मोहिमेत लोकप्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती, स्वयंसेवी संस्था (एनजीओ), राष्ट्रीय सेवा योजना, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संस्था आदींचे प्रतिनिधी उत्साहात सहभागी झाले होते. स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्य, पोवाडे सादर करण्यात आले.
‘कचरा मुक्त तास’ मोहिमेत केलेल्या कार्यवाहीविषयी माहिती देताना उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर म्हणाले की, आज केलेल्या स्वच्छतेतून अडगळीत साचलेला व दुर्लक्षित कचरा, बांधकाम राडारोडा प्राधान्याने संकलित करण्यात आला. चाळी, झोपडपट्ट्या अशा दाट वस्तीच्या भागांतील अंतर्गत रस्ते व गल्लीबोळ स्वच्छ करण्यात आले. बेवारस / भंगार साहित्य आणि सामग्रीची विल्हेवाट लावण्यात आली. रस्ते, दुभाजक, सार्वजनिक भिंतींवरील धूळ, थुंकलेल्या जागांची स्वच्छता करण्यात आली. रस्ते, पदपथ व दुभाजकांवरील अनावश्यक उगवलेली झाडे-झुडुपे काढण्यात आली. तसेच, पदपथ व दुभाजकांच्या दगडी कडा पूर्णतः स्वच्छ करून रंगरंगोटी करण्यात आली. सांडपाण्याच्या मार्गिकांमधील कचरादेखील काढण्यात आला. ‘कचरा मुक्त तास’ मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पूर्ण मुंबईत मिळून एकूण ६४.३ मेट्रिक टन कचरा संकलन करण्यात आला आहे. सुमारे १ हजार ४३९ कामगार, कर्मचा-यांनी १५३ संयंत्रांच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे, अशी माहिती श्री. दिघावकर यांनी दिली