रत्नागिरी, प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात पालेगाव येथे चक्रीवादळात शशिकांत बाळकृष्ण दुर्गवले यांच्या घराचे छप्पर उडून गेले. घराच्या भिंतींना तडे गेले असून खांबांना लावलेला जांभा चिरा सुमारे ४० फूट लांब उडाला. घरावर टाकण्यात आलेले लोखंडी पाईप पूर्णतः वाकले. भर पावसात अशी घटना घडल्याने पावसाचे पाणी घरात शिरले. घरातील सर्व वस्तू पावसाच्या तडाख्यात सापडून भिजून गेल्या. घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
काही काळासाठी निर्माण झालेल्या चक्रीवादळात शशिकांत दुर्गवले, विजय तुकाराम दुर्गवले, गणपत जंगम यांच्या घरांना नुकसान झाले. जोरदार आवाज करीत आलेल्या वादळात शशिकांत दुर्गवले यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. खांब कोसळले, विजवाहिनी वाकली. ग्रामस्थांनी धाव घेत मदत केली. वीज वाहिन्या लोंबकलत असल्याने वीज कनेक्शन बंद करण्यात आले. घटनास्थळी पोलीस पाटील रमेश जाधव, कोतवाल जयवंत जाधव यांनी भेट देवून नुकसानीची पाहणी केली.