‘सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणपूरक विल्हेवाट’ उपक्रमाचा मंत्री ॲड.यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. 8 : मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची ‘पॅडकेअर’ मशीनच्या वापराद्वारे आरोग्यपूर्ण व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणपूरक विल्हेवाट’ या उपक्रमाचा शुभारंभ महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.
सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, पॅडकेअर लॅबचे संस्थापक अजिंक्य धारिया, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे प्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीमध्ये प्रेमभावना असून त्याहीपेक्षा महत्त्वाचे जबाबदारीची जाणीव तिला असते. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुढे जात आहे. स्त्रियांनी संकोच न बाळगता आपल्या समस्यांबाबत पुरुषांशीदेखील मोकळेपणाने बोलावे. प्रत्येक घरात सावित्री घडण्यासाठी जोतिबाची गरज होती त्याचप्रमाणे प्रत्येक घरात सावित्री घडावी यासाठी तशा विचारांच्या पुरुषांची गरज आहे, असे सांगून त्यांनी जागतिक दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, महिला सॅनिटरी नॅपकीन व इतर समस्यांच्याबाब मोकळेपणाने बोलत नसतात. कुठलाही संकोच न बाळगता महिलांनी आपले विचार मांडले पाहिजेत. महिलांसाठी महत्त्वाच्या अशा सॅनिटरी नॅपकीनची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे आवश्यक असून पॅडकेअर मशीनचा मंत्रालय तसेच जिल्हास्तरावर प्रशासकीय कार्यालयातही लावण्याच्या दृष्टीकोनातून विचार करु, असेही त्या म्हणाल्या.