मुंबई,14 जुलै : २०३० पर्यंत स्वत: ला कार्बन मुक्त करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या निश्चयामध्ये हातभार लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पर्यावरण रक्षणासाठी अक्षय ऊर्जेचा वापर तसेच लाखो रुपयांची बचत करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. लोणावळा आणि खंडाळा पट्टा भारतीयांमध्ये एक हिल स्टेशन म्हणून खूपच लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि आता लोणावळा स्टेशन व त्यालगतचा रेल्वे परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि हरीत उर्जेवर चालविला जाईल. लोणावळा आणि खंडाळा दरम्यान सध्या अस्तित्त्वात असलेल्या हिरवळीच्या शिरपेचातील हा तुरा ठरणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील इतर रेल्वे स्थानकांसह लोणावळा आता सौर उर्जेचा वापर करणा-या रेल्वे स्थानकांच्या एलिट क्लबमध्ये समाविष्ट आहे . मध्य रेल्वेने हरित उर्जा उत्पादन आणि दरवर्षी लाखो रुपयांच्या वीज बिलात बचतीसह ग्लोबल वाॅर्मिंग कमी करण्यासाठी आणि हवामान बदलांच्या विरूद्ध लढा देण्यासाठी अनेक महत्त्वाचे हरित उपक्रम हाती घेतले आहेत. मध्य रेल्वेने स्टेशन लाईटिंग व्यतिरिक्त सोलर पॅनेल्स, सौर झाडे आणि सौर वॉटर कूलर इत्यादी देखील स्थापित केल्या आहेत.
लोणावळा रेल्वे स्टेशनच्या फलाट क्र. २/ ३ वरील छतावर ७६ किलोवॅट उर्जा निर्मितीसाठी सौर पॅनेल्स स्थापित केले आहेत. सौर पॅनेल्समधून वर्षाकाठी ६८,४०० किलोवॅटतास क्षमतेची उर्जा उत्पन्नासह लोनावाला रेल्वे स्टेशनच्या वीजबिलात बचत होईल. लोणावळा स्टेशनच्या बाजाराच्या दिशेने बागेची रोषणाई करण्यासाठी दोन सुंदर सौर झाडे प्रत्येकी ४ x १० वॅट एलईडी फिटिंग्जसह ४० वॅट सौर पॅनेल्सने एकत्रित करून उभारण्यात आल्या आहेत. लोणावळ्यातील प्रवाशांच्या दृष्टीने ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे. लोणावळा स्थानकात एक सौरऊर्जेवर चालणारे वॉटर कूलरदेखील देण्यात आले आहे.
बीव्हीटी यार्डातील लोको पायलट / गार्ड रनिंग रूमच्या प्रवेशासाठी ३३ वॅटचे सहा आउटडोर इंटिग्रेटेड टाइप सोलर स्ट्रीट पोल दिले आहेत. लोणावळा येथील बीव्हीटी यार्डमध्ये, ग्रीन गँगहट तयार केली आहे यामध्ये १ किलोवॅटचे छतावरील स्टोरेज सारखे सौर पॅनेल्ससह दोन १६० एएच बॅटरी आणि १ केव्हीए इन्व्हर्टर देण्यात आले आहेत. खंडाळा स्थानकाजवळ लेव्हल क्रॉसिंग गेट क्र .३० येथे १ किलोवॅटचे छतावरील स्टोरेज सारखे सौर पॅनेल्ससह दोन १६० एएच बॅटरी आणि १ केव्हीए इन्व्हर्टरसह देण्यात आली आहे. अक्षय ऊर्जेच्या या सर्व वापरामुळे खंडाळा – लोणावळा रेल्वेचा पट्टा हरित व स्वच्छ उर्जेकडे वळला आहे.
चेंबूर रेल्वे स्टेशन येथे ६० केडब्ल्यूपी ज्यामधून – ५४,००० किलोवॅट तास वार्षिक वीज निर्मिती, डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशन ३० केडब्ल्यूपी ज्यामधून २७,००० किलोवॅटतास, आसनगाव रेल्वे स्टेशन १६.३ किलोवॅट (सौर व वारा) – १४,६७० किलोवॅटतास, आपटा स्टेशन ५ केडब्ल्यूपी ज्यामधून ४,५०० किलोवॅटतास, पेण स्टेशन येथे ६.३ किलोवॅट आणि ५ केडब्ल्यूपी सौर पॅनेल – १०,४७० किलोवॅटतास, रोहा स्टेशन येथे १८.२ किलोवॅट – १६,२०० किलोवॅटतास वार्षिक वीज निर्मिती साठी रूफटॉप ग्रीड कनेक्ट सोलर पैनल उपलब्ध आहेत.
प्रकाशासाठी आणि बॅटरी चार्ज करण्याव्यतिरिक्त मध्य रेल्वेने पेण, आपटा, रोहा, नेरळ आणि लोणावळा स्थानकांवर प्रत्येकी एक सौरऊर्जेवर चालणारे वॉटर कूलर उपलब्ध करुन दिले आहेत. पॉलिप्रोपायलीन फिल्टर कार्ट्रिजसह ४५ एलपीएच कूलिंगच्या १५० लीटर स्टोरेज क्षमतेच्या या १ × २५ डब्ल्यूपी सौरऊर्जेद्वारे चालित वॉटर कूलरमुळे वर्षाकाठी १.४५ लाख रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे.
या व्यतिरिक्त, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक इमारत, कल्याण रेल्वे स्कूल, कल्याण रेल्वे रुग्णालय, कुर्ला आणि सानपाडा कार शेड येथे देखील उर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी सौर पॅनेल बसवलेले आहेत. या अक्षय उर्जा पुढाकारांमुळे उत्पादन १८ .७३ लाख किलोवॅट इतके अपेक्षित आहे आणि उर्जा बिलामध्ये वर्षाकाठी बचत रु. १४५.१ लाख होईल.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने केलेले हे उपाय भारतीय रेल्वेच्या दीर्घकालीन शाश्वत धोरणाचा भाग आहेत. भारतीय रेल्वेमध्ये लोकप्रियता मिळविलेल्या अक्षय उर्जेचा नॉन-ट्रेक्शनसाठी उपयोग केल्याने केवळ उर्जा खर्चामध्ये बचतच होणार नाही, तर रेल्वेला एक हरित, सुरक्षित आणि जगण्यायोग्य वातावरण निर्माण करण्यास देखील मदत होईल.