मुंबईत उद्या ‘आरे ला कारे’; चर्चगेट ते मरीन ड्राइव्ह लॉंग मार्च
मुंबई, (निसार अली) : मुंबईचे फुफ्फुस असलेले आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणवादी संस्था आणि नागरिक आक्रमक झाले आहेत. मेट्रोच्या कारशेडसाठी 27OO झाडे कापू नये, यासाठी ते एकवटले आहेत. उद्या सकाळी नऊ वाजता चर्चगेट ते मरीन ड्राइव्ह असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानेही ट्विट करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. कारशेडसाठी पर्यायी जागा शोधण्याची मागणी केली जात आहे.
दिनांक 8 सप्टेंबर रोजी आरेत विविध क्षेत्रातील मान्यवर आरे वाचवण्यासाठी एकत्र येऊन धरणे देणार आहेत. आरेतील आदिवासी पाड्यातील आदिवासीही सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी मानव साखळी आरे बचावचा नारा देण्यात आला होता.
आरेच्या आंदोलनात विविध क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होत आहेत. झाडे वाचवण्यासाठी समाज माध्यमातून चर्चा घडवली जात असून जनजागृतीही करण्यात येत आहे. त्यासाठी व्हाट्स ऐपवर अनेक ग्रुप बनवले आहेत. मोर फॉर आरे, एव्हरी वन फॉर आरे, आरे वाचवा आरे जगवा, छोटा काश्मीर अशा अनेक ग्रुप वर जोरदार मोहीम सुरू आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामचाही उपयोग जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलक करत आहेत. आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाज माध्यमातून पालिका, राज्य सरकारवर टीका होत आहे.