प्लॅस्टिक ही समस्या नव्हे, तर गोळा न केलेला प्लॅस्टिक कचरा ही खरी समस्या : प्रकाश जावडेकर
New Delhi : एकदा वापरून फेकून देण्याजोग्या- एकल वापराच्या प्लॅस्टिकच्या वस्तू तुलनेने कमी उपयुक्त असतात व त्यांचा पर्यावरणावर होणार परिणाम मात्र फार घटक असतो. त्यामुळे असे प्लॅस्टिक टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. प्लॅस्टिकचा शोध हा विसाव्या शतकातील एक अतिशय उपयुक्त शोध होता हे खरे असले तरी, व्यवस्थित पद्धतीने गोळा ना केलेला प्लॅस्टिक कचरा हा आता पर्यावरणाला एक गंभीर धोका म्हणून आपल्यासमोर उभा ठाकला आहे, असेही ते म्हणाले.
देशात प्लॅस्टिक कचऱ्याची आयात करण्यावर सरकारने याआधीच बंदी घातली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, प्लॅस्टिक कचरा पर्यावरणाच्या दृष्टीने उचित पद्धतीने हाताळला जावा, यासाठी केंद्रीय पर्यावरण,वन आणि हवामानबदल मंत्रालयाने 2016 मध्ये प्रथमच ‘प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम’ आखून दिले. “या नियमांनुसार 50 मायक्रॉन खालच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर (कॅरीबॅग) बंदी घालण्यात आली आहे. अनेक राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनीही एकल वापराच्या ठराविक प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घातली आहे. त्याखेरीज मंत्रालयाने ‘प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम,2016’ यामध्ये सुधारणा करण्यासाठी मार्च 2021 मध्ये मसुदा अधिसूचनाही जारी केली आहे. एकल वापराच्या प्लॅस्टिकच्या कटलरी (जेवणासाठीच्या वस्तू) सारख्या नियत 12 वस्तूंवर बंदी घालण्याचा यात समावेश आहे.”, असेही जावडेकर म्हणाले.
एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तू वापरातून काढून टाकण्यामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगत पर्यावरणमंत्र्यांनी, याविषयी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आणि एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर कमी करणे या दोन्हींविषयी जाणीव जागृत होणे, हे लोकांच्या वागणुकीत बदल होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. या विषयाच्या अनुषंगाने दोन महिने चालणाऱ्या जनजागृती मोहिमेचा मंत्रिमहोदयांनी आज प्रारंभ केला.
प्लॅस्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्या हाताळण्यासाठी आणि एकल वापराच्या प्लॅस्टिकला हद्दपार करण्यासाठी अभिनव विचार, नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या दृष्टीने जावडेकर यांनी यावेळी ‘इंडिया प्लॅस्टिक चॅलेंज- हॅकेथॉन 2021’ ची घोषणा केली. ‘इंडिया प्लॅस्टिक चॅलेंज- हॅकेथॉन 2021’ ही एक आगळीवेगळी स्पर्धा आहे. ‘प्लॅस्टिक प्रदूषणावर उपाय शोधणाऱ्या अभिनव संकल्पना मांडून तोडगा काढण्यासाठी स्टार्टअप/ उद्योजक तसेच उच्चशिक्षण संस्थांचे विद्यार्थी यांनी पुढे येऊन एकल वापराच्या प्लॅस्टिकला पर्याय निर्माण करून दाखवावेत’ असे आव्हान या स्पर्धेद्वारे ठेवण्यात आले आहे.
तसेच, देशभरातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तूंमुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी, शालेय विद्यार्थ्यांकरिता एका देशव्यापी निबंध स्पर्धेची घोषणाही करण्यात आली.