राजापूर : जिल्ह्यात गेले काही दिवस गाजत असलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत काँग्रेस आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ‘रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा र्हास होणार असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध राहिल. संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि आपण तुमच्या सोबत ठामपणे उभे आहोत’, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलगाव येथे प्रकल्पविरोधी ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मांडली. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचेही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना आश्वासित केले.
तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापलेलं आहे. या प्रकल्पाच्या उभारणीच्या अनुषंगाने मे महिन्यामध्ये करण्यात आलेल्या माती परिक्षणाचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. या माती परिक्षणाच्या सर्व्हेक्षणाच्यावेळी प्रकल्प विरोधी ग्रामस्थ आणि पोलिस, प्रशासन यांच्यामध्ये जोरदार संघर्षही झाला होता. दरम्यान सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. पटोले यांनी प्रकल्पविरोधी ग्रामस्थांची भेट घेतली. सोलगाव येथे झालेल्या बैठकीच्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे प्रकाश मांडवकर यांच्यासह रिफायनरी विरोधी संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रकल्प विरोधी ग्रामस्थांशी संवाद साधताना श्री. पटोले म्हणाले की, “ आम्ही इथले रहिवाशी असून आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत होतो. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता नव्हती. प्रकल्पाच्या अनुषंगाने लोकांचे आणि आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित होत असलेल्या विविधांगी सर्व प्रश्नांची उत्तरे शासनाला द्यावी लागणार आहेत. आमचे शेतकरी बांधव आणि गरीबांवर होत असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही. रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा र्हास होणार असेल तर आमचा त्याला विरोध राहिल.” आंदोलना दरम्यान घडलेल्या घटनांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचेही त्यांनी यावेळी आश्वासित असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तत्पूर्वी, प्रकल्पविरोधी समितीच्या पदाधिकार्यांनी प्रकल्पविरोधी आंदोलनाची सविस्तर माहिती दिली.