एसएफआय घेणार ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मध्ये सहभाग; सामील होण्याचे आवाहन
कोल्हापूर : जगभरातील लाखो तरूण २० ते २७ सप्टेंबर दरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास आणि बदलांचा विरोध करण्यासाठी संप आणि निदर्शने करणार आहेत. या सप्ताहात जगातील लाखो लोक जीवाश्म इंधनाचा वापर कमी करावा यासाठी कामाच्या ठिकाणावरून आणि घरातून बाहेर पडणार आहेत.
स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इडियाने याबाबत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक, सुशिक्षित, शेतकरी, कामगार आणि नागरीकांनी ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
जीवश्म इंधनावर अवलंबून असलेला असुरक्षित विकास जागतिक वातावरणाला खिळ घालत आहे. जगातील काही नामशेष होत असलेल्या प्राण्यांच्या प्रजाती आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. तसेच या पृथ्वीवरील असुरक्षित समुदाय, आदिवासी आणि असंख्य प्रजाती त्यांनी निर्माण न केलेल्या हवामान बदलाला सामोरे जावे लागत आहे. ते आता त्यांच्यावर होणारा अन्याय थांबविण्याची मागणी करत आहेत. परंतु ती फक्त त्यांचीच मागणी नसून मानवी अस्तित्वाची लढाई आहे, हे ध्यानात घेऊन आपल्याला पर्यावरण संवर्धन कृतीत आणण्याची गरज आहे, असे एसएफआयने म्हटले आहे.
पँरीस करार रद्द झाल्यास प्रदुषकांचे उत्सर्जन वाढून जागतिक तापमान ३ डिग्री सेंल्सियसने वाढण्याची शक्यता आहे. आयपीसीसी ( Intergovernmental Panel On Climate Change ) म्हणण्यानुसार जर आपण आपल्या चुका १२ वर्षात सुधारल्या नाही तर २०३० नंतर हवामान बदल अपरिवर्तनीय असेल, ते नियंत्रित करणे आपल्या हाताबाहेर जाणार आहे. त्यामुळे मानवाला विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या बाबींचा गांभीर्याने विचार करून कृती करण्याची गरज आहे. आता आपल्याला अभुतपुर्व बदल करून कार्बन उत्सर्जन कमीत कमी ५० टक्के कमी करावा लागेल, अशी माहिती एसएफआयकडून देण्यात आली आहे.
आता शक्य तितक्या लवकर सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे. विज्ञानाचा विधायक वापर करत आपण यावर मात करूयात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जागतिक पातळीवर होणाऱ्या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला काही तास आपल्या वर्गातून, ठिकाणावरून बाहेर येऊन किंवा शक्य असल्यास वर्ग रद्द करून या संपाच्या समर्थनार्थ फलक घेऊन पाठिंबा द्यावा, असे एसएफआय ने म्हटले आहे.
राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, जिल्हाध्यक्ष पंकज खोत, जिल्हा सचिव सर्वेश सवाखंडे, जिल्हा उपाध्यक्ष हरी आवळे, जिल्हा सहसचिव प्रेरणा कवठेकर, प्रमोद मोहिते, रत्नदिप सरोदे, तुषार सोनुले, विनय कोळी, गणेश भालेराव, आकाश मुंढे आदींसह स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा कमिटीने आवाहन केले आहे.