रत्नागिरी : चिपळूण खेड दरम्यानच्या लोटे एमआयडीसीत असलेल्या अनेक रासायनिक कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी भागातील आवाशी माळवाडी गणेशनगर येथील तलावात आज ग्रामस्थाना हजारो मासे मृतावस्थेत आढळून आले. कंपन्या आणि नागरी वस्ती यांच्या दरम्यान असलेल्या या तलावात मासे मृतावस्थेत आढळल्याने स्थानिक नागिरीक आणि कंपन्या यांच्यात आज पुन्हा संघर्ष निर्माण झाला आहे. तळ्यातील मेलेले मासे हे या परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषित पाण्यामुळेच मेले असल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी केला आहे.
या संपूर्ण परिसरात प्रदूषणाच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिक आणि कंपन्या यांच्यात वारंवार संघर्ष होतात. आजही तळ्यात हजारो मासे मृतावस्थेत आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांना घटनास्थळी पाचारण केले हे अधिकारी घटनास्थळी येताच ग्रामस्थानी त्यांना घेराव घातला. प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे व त्यांच्या कंपनीच्या बाबतीतील बोटाचेपी धोरणामुळे लोटे एमआयडीसी परिसर प्रदूषणाच्या विळख्यात लोटला जात असल्याचे म्हणत ग्रामस्थानी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
दरम्यान या परिसरातील कंपनीच्या अधिकार्यांनी घटनास्थळी येत मृत माशांची पाहणी करत प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले आहेत, ज्या ठिकाणी तळ्यातील मासे मेले आहेत तो परिसर कंपनीपासून 500 मीटर अंतरावर आहे. तळ्याच्या एकाच कोपऱ्यातील मासे मेले आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. पाण्याचे रिपोर्ट्स समोर येणे गरजेचे असल्याचं म्हणत कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे प्रदूषणाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आणि कंपन्या यांच्यातील संघर्ष टोकाला गेलेला पहायला मिळाला