पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित राखून आर्थिक वृद्धीला चालना देण्याच्या वाहन उद्योगाच्या दुहेरी जबाबदारीला केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केले अधोरेखित
New Delhi : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) ने आयोजित केलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केलेल्या बीजभाषणात आपले विचार व्यक्त केले.निसर्गपूरक चक्रीकरण ही संकल्पना असलेल्या या परिषदेत वाहन उद्योगातील हितधारक शाश्वत विकास आणि चक्राकारिता यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते.
भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या आणि जगात प्रवासी वाहनांच्या विक्रीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वाहन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर चक्राकारिता या विषयावर घेतलेल्या पुढाकाराबद्दल यादव यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात एसआयएएमची प्रशंसा केली. निसर्गातील कार्यक्षम पुनर्चक्रीकरण प्रणालींपासून प्रेरणा घेऊन या वृद्धीला पर्यावरणीय शाश्वततेसोबत जोडण्यावर त्यांनी भर दिला. निसर्गपूरक चक्रीकरणावर भर देत त्यांनी सांगितले की निसर्गासारखे पुनर्चक्रीकरण कोणीही करू शकत नाही. निसर्गासोबत तुलना केली तर त्या उत्पादनाची आपण कधीच बरोबरी करू शकत नाही, तरीही त्यामध्ये नासाडीचे प्रमाण शून्य असते. आपल्या उत्पादन क्षमतांविषयी अभिमान बाळगताना आपण टाकाऊ सामग्रीच्या व्यवस्थापनाबाबत निसर्गमातेकडून धडा सुद्धा घेऊया, असे त्यांनी पुढे नमूद केले. ज्यावेळी पुनर्चक्रीकरणाची धोरणे तयार करायची असतील त्यावेळी निसर्गाला आदर्श माना असे आवाहन मंत्र्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी यादव यांनी चक्राकार अर्थव्यवस्थेकडे संक्रमित होण्याच्या आवश्यकतेला अधोरेखित केले. भारताच्या भवितव्यासाठी ही बाब अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी चक्राकारितेच्या तिहेरी लाभांना अधोरेखित केले.
- आर्थिक वृद्धी: कच्या मालावरील अवलंबित्व कमी करणे आणि उत्पादन खर्च कमी करणे.
- पर्यावरणीय शाश्वतता: परिसंस्थेची हानी आणि उत्सर्जन किमान स्तरावर ठेवणे.
- सामाजिक परिणाम: हरित रोजगार निर्माण करणे आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे.
स्वयंचलित वाहन उद्योग क्षेत्रात शाश्वततेला पाठबळ देणाऱ्या सरकारच्या प्रमुख धोरणांची मंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली
- वाहनाची विल्हेवाट(भंगारात) लावण्याचे धोरण(2021); इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन; आणि
- आयुर्मान संपलेल्या वाहनांविषयीचे (ELVs) नियम2025: 1 एप्रिल 2025 पासून लागू होणारे हे नियम पर्यावरणाला पूरक पद्धतीने वाहनांची विल्हेवाट सुनिश्चित करणारे आणि नोंदणीकृत सुविधांमध्येच ईएलव्हींची योग्य प्रकारे विल्हेवाट सुनिश्चित करून उत्पादकांना विस्तारित उत्पादन जबाबदारी(ईपीआर) पार पाडण्यास प्रवृत्त करणारे आहेत. वाहनांना भंगारात काढण्यासाठी देखील प्रोत्साहन लाभ दिले जात आहेत.
यादव यांनी शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यात वाहन उद्योग क्षेत्राच्या भूमिकेवर भर दिला, ज्यामध्ये एसडीजी 7 (परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा), एसडीजी 8 (योग्य काम आणि आर्थिक वृद्धी), आणि एसडीजी 9 (उद्योग, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधा) यांचा समावेश आहे. बॅटरी चार्जिंगचा पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी ईव्हींसाठी नवीकरणीय ऊर्जेच्या आवश्यकतेवर देखील त्यांनी भर दिला.
पुनर्चक्रीकरणीय रचनांचा अवलंब करून, डीलरशिप कामात शाश्वततेला प्रोत्साहन देऊन आणि ग्राहकांच्या जागरुकतेत वाढ करून चक्राकार अर्थव्यवस्थेकडे संक्रमित होण्याकडे पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी एसआयएएम आणि स्वयंचलित वाहन उद्योगाला केले.