मुंबईच्या मातीला अनुरुप झाडे लावण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन
स्थानिक प्रजातींचीच झाडे लावण्याच्या धोरणास वृक्ष प्राधिकरणाची मंजूरी
तामण, बहावा, करंज, चंपा, बकुळ, कडुनिंब यासारखी झाडे लावण्याचे निर्देश
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मातीची वैशिष्टये लक्षात घेऊन स्थानिक प्रजातींचीच झाडे लावण्याच्या धोरणास आज बृहन्मुंबई वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीदरम्यान सदर धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणानुसार यापुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी देखील त्यांच्या सोसायटी परिसरात / प्रांगणात झाडे लावतांना स्थानिक प्रजातींचीच झाडे लावावीत, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी यानिमित्ताने केले आहेृ. तर आज मंजूर झालेल्या धोरणानुसार स्थानिक प्रजातींच्या झाडांमध्ये सध्या ४१ प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती वृक्ष प्राधिकरणाचे सचिव तथा उद्यान अधिक्षक श्री. जितेन्द्र परदेशी यांनी दिली आहे..
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” असे सांगणाऱया आपल्या संस्कृतीने झाडे लावण्याचे आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व नेहमीच अधोरेखित केले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने तर वृक्षारोपणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातींची व बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मुंबईतील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल अशी झाडे लावणे आवश्यक आहे. स्थानिक प्रजातींच्या झाडांऐवजी इतर प्रजातींची झाडे लावल्यास ती मुंबईच्या मातीमध्ये घट्टपणे मूळ धरत नाहीत. परिणामी अशी झाडे पडण्याचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात घेऊन वृक्षप्राधिकरणाने स्थानिक प्रजातींची झाडे लावण्याच्या धोरणास मंजुरी दिली आहे. अशीही माहिती या निमित्ताने उद्यान विभागाद्वारे देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई परिसरात झाडे लावताना ४१ स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यास प्राधान्य देण्याचे धोरण आज मंजुर करण्यात आले आहे. यामध्ये वड, पिंपळ, उंबर, कांचन, कदंब, गुंज, पळस, निम, महोगनी, मोह, बहावा, साग, अर्जुन, ऐन, किंजळ, सीता अशोक, उंडल, नागकेशर, चंपा, शिवन, शिरीष, करंज, बकुळ, बेल, तामण, हिरडा, बेहडा, नारळ, आवळा, खैर, तेतू, आंबा, पुत्रंजीवा, जंगली बदाम, बिब्बा, पारिजातक, रिठा, चंदन, कुंभ, फणस, चाफा या ४१ प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. तसेच विविध कारणांमुळे वृक्ष उन्मळून पडल्यास त्या वृक्षाच्या जागी स्थानिक प्रजातींचीच झाडे लावण्यात येणार आहेत यापैकी काही झाडांची ठळक वैशिष्ट्ये खालील तक्त्यानुसार आहेत.
झाडाचे स्थानिक नाव | झाडाचे शास्त्रीय / इंग्रजी नाव | इतर काही वैशिष्ट्ये
|
तामण
(Taman)
|
Lagerstroemia geginae | या वृक्षाचे फूल महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प आहे. सु. ९–१८ मी. उंचीचा हा पानझडी वृक्ष शोभेकरिता भारतात सर्वत्र लावलेला दिसतो. रस्त्याच्या दुतर्फा व बागेत हा सामान्यतः आढळतो. पश्चिम द्वीपकल्प, आसाम, ब्रम्हदेश, श्रीलंका, मलाया व चीन इ. प्रदेशांत नद्यांच्या काठाने अगर दलदली भागातही आढळतो |
बहावा | Cassia fistula | बहावाच्या फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष इंग्रजीमध्ये ‘Golden shower tree’; तर हिंदी मध्ये `अमलतास’ म्हणून ओळखला जातो. |
करंज
|
Pongamia pinnata
(Pongam) |
करंजाच्या बियांपासूनच काढण्यात येणारे तेल हे ‘करंजतेल’ म्हणून ओळखले जाते. |
नागकेसर | Mesua ferrea | नागकेसर या झाडाचे फूल त्रिपुरा या राज्याचे राज्य पुष्प आहे. दिसायला आकर्षक असणा-या या झाडाचे औषधीय गुणधर्म देखील असल्याचे मानले जाते. |
बकुळ | Mimusops elengi
|
सुगंधी फुलांसह औषधीय गुणधर्म असणारे झाड. फुलांतील सुगंधी द्रव्य अत्तरे, तेल यांमध्ये वापरतात. फुले वाळवल्यावरही त्यांना बराच काळ सुगंध येतो. खोडाच्या सालीत ३-७% टॅनीन असते; साल कातडी कमाविण्यास व कापडाला पिंगट रंग देण्यास उपयुक्त मानले जाते. महाभारत, बृहत्संहिता, सुश्रुतसंहिता, कौटिलीय अर्थशास्त्र तर साहित्यात मेघदूत, रघुवंश, मालतीमाधव आणि गीतगोविंद यामध्येही बकुळाचा उल्लेख आढळतो; हा वृक्ष घराजवळ लावण्यास योग्य मानला जातो. |
पुत्रंजीव /
पुतंजीव / पुत्रजीवी |
Putranjiva roxburghii | सदापर्णी व लोंबत्या फांद्यांचा हा वृक्ष भारतातील उष्ण भागांत व गर्द जंगलांत आढळतो. कोकण व कारवार भागांत तो सामान्यपणे आढळतो. साल गर्द करडी करडी पण कोवळेपणी पांढुरकी, त्वक्षायुक्त असुन तीवर असंख्य आडवी वल्करंध्रे दिसतात. या झाडास लहान, पिवळट फुले मार्च ते मे दरम्यान येतात. |
कडूनिंब /
नीम |
Azadirachta indica | गुढीपाडव्याला म्हणजेच मराठी नववर्षाच्या स्वागताला कडूनिंबाचे औषधीय गुणधर्म लहान थोरांपासून अनेकांना माहिती आहेत. कडूनिंबाच्या काडीने दात घासण्याने अनेकांच्या दिवसाची सुरवात होते. |
उंबर / औदुंबर
|
Cluster fig / Ficus racemosa | उंच व सदापर्णी असणारा हा वृक्ष ब्रह्मदेशात, श्रीलंकेत व भारतात सह्याद्री, कोकण, राजस्थान, खासी टेकड्या इ. भागात प्रामुख्याने आढळतो. धार्मिक दृष्ट्या महत्त्व असणा-या या झाडाचे अनेक औषधीय गुणधर्म असल्याचेही मानले जाते. |
कदंब
|
Burflower Tree / Anthocephalus indicus | हा एक उपयुक्त व मोठा पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र (उत्तर कारवारचे घनदाट जंगल, उपहिमालयाचा प्रदेश, आसाम इ.) तसेच श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश येथेही आढळतो. |
पिंपळ
|
Peepal / Ficus religlosa | हा मोठा पानझडी वृक्ष भारतासह ब्रह्मदेशात व श्रीलंकेतही आढळतो. धार्मिक दृष्ट्या महत्त्व असणा-या या झाडाचे अनेक औषधीयागुणधर्म असल्याचेही मानले जाते. |
बेहडा / बहेडा
|
Beach Almond / Tarminalia chebula | ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात, ‘त्रिफळा’ या औषधामध्ये वापरण्यात येणा-या तीन घटकांपैकी `बेहडा’ हा एक घटक आहे. |
वड / वटवृक्ष
|
Banyan Tree / Ficus benghalensis | भारताचे राष्ट्रीय झाड असणारा `वटवृक्ष’ त्याच्या पारंब्या आणि औषधीय गुणधर्माबरोबरच सावलीसाठीही प्रसिद्ध आहे. धार्मिक दृष्ट्याही महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या वृक्षाच्या खोडांतून फुटलेल्या जमिनीपर्यंत पोचणा-या मुळ्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. |
कांचन | Bauhinia purpurea
|
हा सुमारे ६ ते ९ मीटर उंच, सरळ, ताठ, सदापर्णी व शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष ब्रह्मदेश, चीन व भारत येथे आढळतो. या झाडाची फुले सुवासिक, मोठी व गुलाबी जांभळी रंगाची असून सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये फांद्यांच्या टोकास गुच्छासारख्या मंजरीत येतात. या वृक्षाचे लाकूड साधारण मजबूत व हलके असून साध्या घर बांधणीत व शेतीच्या अवजारांकरिता वापरतात. संस्कृत वाङ्मयात `कोविदार’ या नावाने या वृक्षाचा उल्लेख आढळतो. |