पर्यावरण रक्षणात महाराष्ट्राचे भरीव योगदान : एडगार्ड डी. कगन
मुबई : विक्रमी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वन, वन्यजीव रक्षण आणि पर्यावरण संरक्षणामध्ये भरीव योगदान देत असल्याचे प्रशंसोद्गार अमेरिकेचे भारतातील महावाणिज्य दूत एडगार्ड डी. कगन यांनी काढले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांनी नुकतीच त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
आपण विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांना भेटलो पण त्यापैकी एकाही अर्थमंत्र्यांकडे वन विभागाचा पदभार नाही. मात्र, महाराष्ट्र राज्यात ही बाब वेगळी असल्याचे एडगार्ड यांनी यावेळी आवर्जून नमूद केले तसेच मुनगंटीवार यांच्या वन्यजीव संवर्धन, संरक्षण आणि वृक्षलागवडीच्या ध्यासाचे त्यांनी कौतुक केले. वन विभागाने लोकसहभागातून सुरु केलेल्या ५० कोटी वृक्ष लागवडीबाबत त्यांनी खूप औत्सुक्य दाखवले. वृक्ष लागवडीचे संकल्प आणि त्याची विक्रमी स्वरूपात होणारी पूर्तता याबद्दल त्यांनी खूप आनंद व्यक्त केला. महाराष्ट्राचा हा प्रयत्न कार्बन फुट प्रिंट कमी करण्यामध्ये नक्कीच उपयुक्त सिद्ध होईल असेही ते म्हणाले.
अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी देशात राबविण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणी संदर्भात एडगार्ड यांना माहिती दिली. या ‘कर प्रणाली’ची सुलभ आणि यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यामध्ये महाराष्ट्राचे असलेले योगदान त्यांनी अधोरेखित केले.
वृक्ष लागवडीत पारदर्शकता आणण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या उपाययोजना तसेच हॅलो फॉरेस्ट, १९२६, ग्रीन आर्मी, रोपे आपल्या दारी, माय प्लांट मोबाईल ॲप अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती वनमंत्र्यांनी उपस्थित मान्यवरांना दिली.
एडगार्ड यांनी मुनगंटीवार करत असलेल्या प्रयत्नांचा, त्यांच्या दूरदृष्टीचा आणि कामात आणत असलेल्या पारदर्शकतेचा विशेष उल्लेख केला. या सर्व उपक्रमांचे कौतुक करताना यातील काही उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीत उभयतांनी देश आणि राज्याची अर्थव्यवस्था, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, उद्योग क्षेत्राची वृद्धी अशा विविध विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही बैठकीत विचार विनिमय झाला. हे दोन्ही देश नैसर्गिक मित्र असून परस्पर सहकार्याने आणि मैत्रीने जगासमोर विकासाचे एक उत्तम उदाहरण निर्माण करू शकतात असेही एडगार्ड यावेळी म्हणाले. वनमंत्र्यांनी सुरुवातील एडगार्ड यांचे ताडोबातील वाघाची प्रतिकृती आणि वन विभागाचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.