कल्याणमध्ये विहिरीत बुडून पाच जण ठार; विषारी वायूमुळे घटना
डोंबिवली, (प्रशांत जोशी): औद्योगिक विभागातील खंबाळपाडा परिसरात ड्रेनेज साफ करण्यासाठी चेंबर मध्ये उतरलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी कल्याण पूर्वेतही भयानक प्रकार घडला. सांडपाणी मिश्रित विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्ती बुडाल्या. तर त्यांना वाचवण्यासाठी या विहिरीत उतरलेले अग्निशमन दलाचे दोन कर्मचारीही बुडाल्याने खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत पाच जण ठार झाले असल्याने कल्याण-डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असणाऱ्या भिमाशंकर मंदिराजवळ ही विहीर आहे. अत्यंत खोल असणाऱ्याया विहिरीच्या सफाईसाठी एक स्थानिक नागरिक उतरला होता. तो बऱ्याच वेळ होऊनही वर न आल्याने त्याच परिसरातील राहुल गोस्वामी विहिरीत उतरला. मात्र सफाई कर्मचाऱ्यापाठोपाठ तोही बाहेर न आल्याने त्याचे वडील गुणवंत गोस्वामी देखील विहिरीत उतरले आणि ते पण विहिरीत बेपत्ता झाले. या घटनेची माहिती महापालिका अग्निशमन दलाला मिळाल्याने अग्निशमनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यातील एक अग्निशमन कर्मचारी विहिरीत उतरत असताना भयंकर विषारी गॅसमुळे त्याला चक्कर आली आणि तो खाली विहिरीत पडला. तो पडत असताना पाहून अग्निशमन दलाच्या आणखी एका कर्मचाऱ्याने धाव घेत तो विहिरीत उतरला. मात्र त्याला बाहेर काढत असताना तोही विहिरीतील विषारी वायूमुळे आतमध्ये पडला. बराच वेळ होऊनही त्यापैकी एकही जण वर न आल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेचे गांभिर्य ओळखून अग्निशमन दलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. परंतु पाच जणांपैकी एकालाही वाचवण्यात यश आले नाही. अनंत शेलार आणि प्रमोद वाकचौरे अशी या दोघा अग्निशमन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दरम्यान या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. घटनेप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितनुसार नगरसेवक नवीन गवळी यांनी परिसरातील मंदिरात आणि विहिरीत नाल्याचे सांडपाणी जात असल्याबाद्द्ल तक्रार केली होती. याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले कि, या घटनेची तातडीने चौकशी करून या प्रकरणी दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.