माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये आढळला फ्लेमिंगो; नैसर्गिक अधिवासात रवानगी
मुंबई प्रतिनिधी ता.13 : माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे सोमवार, (ता.11) जुलै रोजी वाट चुकलेला एक फ्लेमिंगो पक्षी आढळून आला. त्याला वाचविण्यात अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लांट अँन्ड अनिमल्स वेलफेयर सोसायटी – मुंबई यांच्या स्वयंसेवकांना यश आले आहे.
माटुंगा येथील रेल्वे कर्मचारी तुकाराम चव्हाण यांनी अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लांट अँन्ड अनिमल्स वेलफेयर सोसायटी – मुंबई यांना फोन करून माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये फ्लेमिंगो आढळून आल्याची माहिती दिली असता; मुंबई शहराचे वन्यजीव वॉर्डन सुनीश सुब्रमण्यन यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथक, स्वयंसेवक सुनील गुप्ता आणि भूषण साळवे यांनी फ्लेमिंगो पक्षाला मोठ्या कसरतीने वाचवले असून पक्षाच्या आरोग्य तपासणीसाठी डॉ.राहुल मेश्राम यांच्याकडे नेण्यात आले. व नंतर एरोली येथील वनविभागाच्या खारफुटी कक्षाशी समन्वय साधून फ्लेमिंगोला वन कर्मचाऱ्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात आले. जर कोणी वन्यप्राणी संकटात सापडले तर नागरिक एसीएफ आणि पीएडब्ल्यूएस – मुंबई हेल्पलाइन 9833 480388 किंवा फॉरेस्ट हेल्पलाइन 1926 वर कॉल करू शकतात. असे मुंबई शहराचे वन्यजीव वॉर्डन सुनीश सुब्रमण्यन यांनी सांगितले.