कांजुर डम्पिंग बंद, न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : खा. संजय दिना पाटील
देवनार डम्पिंगवरही कायम स्वरुपी तोडगा काढावा.
मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) – कांजुरमार्ग डम्पिंगची जागा तीन महिन्यात खाली करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत स्थानिक नागरिकांनी केले आहे. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी यापुर्वीच कांजुर व देवनार मधील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी केली होती. हा विषय संसदेत ही मांडण्यात आला होता. शिवाय पालिका आयुक्त भुषण गगराणी व सहाय्यक आयुक्तांना याबाबत पत्र देण्यात आले होते.
कांजुरच्या डम्पिंग ग्राऊंडमुळे भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी व घाटकोपर मध्ये राहणा-या नागरिकांना रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. डम्पिंग ग्राऊंडमुळे या भागात दुर्गंधी पसरली असून मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे त्रास, त्वचा रोग व इतर आजारांमुंळे हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. याबाबत खासदार संजय दिना पाटील यांनी संसदेत हा मुद्दा मांडत कांजुर व देवनार मधील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी केली होती. याबाबत पालिक आयुक्त भूषण गगराणी तसेच सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले होते.
कांजुर डम्पिंगची जागा संरक्षित वनजमीन असल्याने डम्पिंगचा विस्तार करता येणार नाही. त्यामुळे तीन महिन्यात कांजुर डम्पिंगची जागा पुर्ववत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
कांजुर डम्पिंगबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. कांजुरमार्ग प्रमाणेच देवनार डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात यावे, याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी व सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. या दोन्ही डम्पिंग ग्राऊंडमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे त्रास, त्वचा रोग, केस गळणे या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत संसदेत हा विषय प्रामुख्याने मांडण्यात आला होता. मुंबई शहरातील सर्व कचरा ईशान्य मुंबईत येत असून त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय. मुलुंडचे डम्पिंग बंद झाले असले तरी अद्याप ते खाली करण्यात आले नाही. कंत्राटदाराला वारंवार मुदत वाढवून दिली जात आहे. त्याचा अद्यापही त्रास मुलुंडकरांना होत आहे. त्यामुळे कांजुर प्रमाणेच देवनारचे डम्पिंगही तातडीने बंद करण्यात यावे, अशी माझी मागणी आहे.
संजय दिना पाटील
खासदार, ईशान्य मुंबई, महाविकास आघाडी