नदीरक्षक योगेश : कासाडी नदीपात्रातून त्याने काढला 15 गाड्या कचरा, तिवरांचेही करतोय संरक्षण
पनवेल : नदी हा आपल्या जीवनातील मुख्य स्रोतांपैकी एक आहे. पाणी आहे तर जीवन आहे, त्यामुळे नद्या जगवल्या पाहिजेत, या विचाराने झपाटलेल्या योगेश पगडे या 30 वर्षीय तरुणाची ही कहाणी आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारी आहे. योगेशला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
योगेश हा पनवेलजवळील रोडपाली या गावातील ग्रामस्थ आहे. त्याच्या गावाजवळून कासाडी नदी वाहते. नदीत मोठ्या प्रमाणावर कचरा वाहून येतो, त्यामुळे नदीपात्र प्रदूषित होते. हे योगेशला समजले. तेव्हापासून त्याने नदीत वाहून आलेला कचरा गोळा करून नदीपात्र स्वच्छ करण्याचा वसा उचलला आहे. योगेशने मागील दोन वर्षांत 15 गाड्या कचरा गोळा करून नदी संवर्धनासाठी कार्य सुरू ठेवले आहे.
ही पद्धत योगेश वापरतो
भर पावसाळ्यात देखील योगेश नदी स्वच्छ करण्याचे कार्य करतो. योगेशने नदीपात्रात जाळ्या लावल्या आहेत. वाहून आलेला कचरा त्यात अडकतो. योगेश मग तो कचरा होडीत भरून आणतो.
तिवरांच्या संरक्षणाचेही कार्य
योगेशच्या रोडपाली गावाजवळ खाडीकिनाराही आहे. या ठिकाणी तिवरांची झाडे आहेत. तिवरांच्या मुळाला प्लास्टिक कचरा चिकटून बसत असल्याने जलचरांचे वसतिस्थान धोक्यात आले आहे. योगेश तिवरांच्या झाडाभोवती साचलेला कचरा स्वच्छ करण्याचे कार्य करत आहे.
पर्यावरणरक्षक म्हणून ओळख
योगेशचा पारंपरिक व्यवसाय मासेमारीचा असला तरी पनवेल तालुक्यात तो पर्यावरणरक्षक म्हणून परिचित आहे. कासाडी नदी आणि खाडी किनारा स्वच्छ करणे यासाठी तो खूप वेळ देत आहे.
योगेशचे म्हणणे…
कासाडी नदी कोपरा खाडीला मिळते. ही खाडी बेलापूर येथील समुद्राला मिळते. कासाडी नदी प्रदूषित होत आहे सोबत खाडीपरिसरालाही प्रदूषणाने ग्रासले आहे. खाडी आणि नदी प्रदूषित होत असल्याने मासेमारीवरही दुष्परिणाम होत आहे. मिळणाऱ्या माशांची संख्या कमी झाली आहे. नदीचे पाणी स्वच्छ झालेच पाहिजे. आपण सर्वांनी नद्या टिकवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. प्रदूषण का होते याचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात. प्लास्टिक कचरा वाहून येत आहे. प्लास्टिकचा वापर बंद होणे आवश्यक आहे. नदीत वाहून आलेले प्लास्टिक जलचर खाद्य म्हणून खातात. प्लास्टिकमुळे पाण्याचा निचरा होत नाही. प्लास्टिक पुढे खाडीत तिवरांच्या झाडात अडकून पडते. जलचरांच्या प्रजातीवर याचा गंभीर परिणाम होतो. ते होऊ नये यासाठी निरंतर प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणूनच पर्यावरण संवर्धनासाठी सज्ज होऊ या!