सागरतटीय जिल्ह्यात लागणार ४१ लाख कांदळवन रोपे : सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड सुरु आहे. याअंतर्गत सागरतटीय जिल्ह्यांमध्ये मुंबईच्या कांदळवन कक्षामार्फत ४१ लाख कांदळवन रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार म्हणाले, बृहन्मुंबई परिसरात कांदळवन कक्ष ९ लाख रोपे लावणार आहे. याशिवाय ३ लाख रोपे ठाण्यात, १३ लाख रोपे डहाणूत, रायगड जिल्ह्यात १५ लाख, रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख रोपे लावली जाणार आहेत. आतापर्यंत ३.३३ लाख रोपांची लागवड झाली असून उर्वरित कांदळवन रोपे ऑगस्टनंतर लावली जातील.
कांदळवन क्षेत्र हे समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील जैवविविधतेचे भांडार समजले जाते. मत्स्य बीज तयार होण्याचा उगम व स्रोत आहे. त्याचबरोबर त्सुनामी आणि चक्रीवादळापासून समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील लोकांचे संरक्षण करण्यामध्ये कांदळवन क्षेत्र हे महत्वाची भुमिका बजावते. कांदळवन क्षेत्रात सागरी जीवांचे चिरकाल संवर्धन होते हे लक्षात घेऊन कांदळवन कक्षामार्फत कांदळवन विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कांदळवन स्वच्छता मोहिमेत ८ हजार टन कचरा उचलला
कांदळवन कक्ष मुंबई यांच्यावतीने लोकसहभागातून कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. . या अभियानात २५००० लोकांनी सहभाग घेतला.त्यामध्ये ११.०३ कि.मी.समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील ८००० टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या अभियानाला “शहरी वनक्षेत्र स्वच्छतेचे भारतात्तील सर्वात मोठे अभियान” असे संबोधण्यात आले असल्याची माहिती ही मुनगंटीवार यांनी दिली.
कांदळवनातून उपजीविका
समुद्र किनाऱ्यावरील गावांमध्ये कांदळवन संयुक्त वन सह व्यवस्थापन समित्या स्थापन करुन त्याद्वारे लोकसहभाग घेऊन कांदळवनाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न आहे. त्याशिवाय स्थानिक लोकांना कालवे पालन, खेकडा पालन, ओएस्टर फार्मिंग इ.द्वारे रोजगार आणि उपजिविकेची साधने निर्माण करुन देण्यात येत आहे. महिला बचत गटांना ताकद देऊन कांदळवन संरक्षणामध्ये त्यांचा सहभाग घेण्यात येत आहे.
तिवर संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्याचा निर्णय
कांदळवन संवर्धनाच्या अधिक परिणामकारक प्रयत्नांसाठी व किनाऱ्यावरील जनतेच्या जीवनमानात सकारात्मक प्रभाव आणण्यासाठी शासनाने तिवर संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून अशाप्रकारे प्रतिष्ठान स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.