आरएमपी आणि पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित कार्यशाळा : पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासासाठी भारतीय तत्त्वज्ञानावर चर्चा
मुंबई: २९ मे: गेले शतकभर आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रचंड वेगाने विकास झाला, पण तो शाश्वत मुल्यांवर आधारित नसल्याने निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. हे बदलायचे असल्यास शाश्वत विकासाला पर्याय नाही. यासाठी जगभर अनेक प्रयत्न सुरु आहेत, ज्यात भारत अग्रेसर आहे. विकासाची दिशा मांडण्यासाठी ठाण्याच्या पर्यावरण दक्षता मंडळ व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने तज्ञ मार्गदर्शनाखाली २-दिवसीय शाश्वत विकास संकल्पना शिबीर आयोजित केले. शाश्वत प्रगतीत प्राचीन भारतीय विचारधारेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली.
जलसुरक्षा, हवामान बदल व नवीकरणीय ऊर्जा
पर्यावरण रक्षण हा बहुआयामी व गुंतागुंतीचा विषय असून त्याच्या मुळाशी जायचे असल्यास अनेक पैलूंवर चिंतन व कृती आवश्यक असते. सुरुवातीला विद्याधर वालावलकर, उपाध्यक्ष, पर्यावरण दक्षता मंडळ, यांनी एखाद्या विकासकामातून मिळणारा लाभ व झालेली निसर्गाची हानी यांचा समग्र विचार आवश्यक असल्याचे सांगितले. पाण्याची उपलब्धता, वापर व जलसुरक्षा यांवर बोलताना डॉ. उमेश मुंडल्ये, जल संवर्धन व देवराई अभ्यासक, म्हणाले, “जगभर प्रचलित विकासाचे रूप शहरीकरण व औद्योगीकरणावर भर देणारे असून चुकीच्या धोरणांमुळे जलस्रोत, शेती व वनांची हानी होते. जनसहभागातून योग्य पावले उचलली तर जल संरक्षण शक्य होईल.” हवामान वाचन, हवामान बदल व जागतिक तापमानवाढीवर भाष्य करताना श्री. कृष्णानंद होसाळीकार, हवामान तज्ञ, म्हणाले की येणाऱ्या काळात हवामान अंदाज वर्तवणे हे आव्हानात्मक होणार आहे. पद्मपुराणाचा दाखला देत ते म्हणाले की निसर्ग संवर्धन करीत प्रदूषण टाळले तर माणूस नरकवासापासून दूर राहील. नव्या जगासाठी नवीकरणीय ऊर्जेचे महत्त्व मांडताना डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, संशोधक व लेखिका, म्हणाल्या, “शारीरिक ताकद व जैवइंधनांपासून खनिज इंधनांपर्यंतच्या स्थित्यंतरातून झालेली तापमानवाढ रोखण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेचा वापर आवश्यक झालाय.”
प्रजाती संवर्धन, कार्बन क्रेडीट व संयमित भारतीय विचार
भारतासारख्या उष्णकटिबंधीय समृद्ध जैवविविधता असलेल्या देशाला हा वारसा जपणे अत्यंत आवश्यक आहे. जैवविविधता व त्याच्या सुरक्षा प्रयत्नांच्या दिशेबद्दल डॉ. मिलिंद वाटवे यांनी प्रबोधन केले. पुढील व्याख्यानात कार्बन उत्सर्जन, कार्बन क्रेडीट व कार्बन स्थिरीकरण या परवलीच्या संकल्पनांवर डॉ. अजित गोखले यांनी मार्गदर्शन केले. शाश्वत जीवनशैलीचे पुरस्कर्ते श्री. दिलीप कुलकर्णी म्हणाले, “प्राचीन भारतीय ऋषी-मुनींनी ओळखले होते की अनिर्बंध उपभोग फक्त क्षणिक सुख देतो व त्यातून अनेक तोटे होतात. तैत्तिरीय उपनिषदातील आनंदाची व्याख्या सांगते की इंद्रिये, मन व बुद्धीला योगमार्गाने शांत करीत समतोल साधल्यास शाश्वत आत्मिक आनंद मिळतो. जगाने अंगिकारलेल्या प्रदूषणकारी विकासाच्या मार्गाने क्षणिक सुख मिळते. चार पुरुषार्थांच्या चौकटीत राहून संयमित उपभोग हे चिरकालीन आनंदाचे साधन आहे. अशाप्रकारे मानवी समाज शाश्वत विकासाकडे जाऊ शकतो.”
श्री. भावेश ब्राह्मणकर यांनी आंतरराष्ट्रीय धोरणांत विविध स्तरांवर समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. श्याम असोलेकर यांनी विज्ञान-तंत्रज्ञान व पर्यावरणाचा संबंध समजावला. डोंबिवलीचे उद्योजक श्री. रमाकांत बारी म्हणाले, “येथील मार्गदर्शनामुळे मनामध्ये स्पष्टता येऊन काय कृती करावी हे लक्षात आले.” नाशिकचे आर्थिक सल्लागार श्री. शंकर फुटाणे म्हणाले की इथे मिळालेल्या ज्ञानामुळे प्लास्टिक टाळण्यापलीकडे आर्थिक जागृतीसोबत पर्यावरण जागृतीही केली पाहिजे हे कळले. मुंबई, ठाणे, डोंबिवली, मुरबाड, महाड, वसई, पुणे व नाशिक येथील पर्यावरण क्षेत्रात काम करणारे ३७ महिला व पुरुष अभ्यासक, पत्रकार, संशोधक, कार्यकर्ता, व्यावसायिक व अभियंता उपस्थित होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी १९८२ पासून क्षमता विकास, प्रशिक्षण, जागृती, संशोधन व प्रकाशन यांत कार्यरत आहे. पर्यावरण दक्षता मंडळ गेली २५ वर्षे पर्यावरण संवर्धन, संशोधन व शिक्षण यांत काम करतेय.