गंगेच्या उपनद्यांमध्ये प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिक कठोर निरीक्षण
नवी दिल्ली, 9 जुलै : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीमध्ये आज नवी दिल्लीत आंतर-मंत्रालयीन बैठक झाली. या बैठकीला उभय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पर्यावरण, वन तसेच केंद्रीय जल आयोग, राष्ट्रीय जल विकास यंत्रणा आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याविषयांशी संबंधित प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करण्यात आली.
गंगा प्रदूषित होवू नये म्हणून गंगा आणि तिच्या प्रमुख उपनद्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बळकट करण्यासंबंधी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला जलशक्ती मंत्र्यांनी सूचित केले. गंगेच्या उपनद्यांमुळे होणा-या गंगाजल प्रदूषणाला आळा घालण्यासाठी खूप प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची नियमित तपासणी करण्यात येते. त्याचप्रमाणे स्वच्छ गंगा राष्ट्रीय मोहिम यशस्वी करण्यावर भर देण्यासाठी गंगेतल्या पाण्याच्या गुणवत्तेचे नियमित परीक्षण करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले. यासाठी योग्य यंत्रणा विकसित करण्यावर या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली.
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दोन्ही मंत्रालयाच्या अधिकारी वर्गाला, राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पांसाठी एकत्र येवून, एकमेकांच्या सहकार्याने वेगाने काम पूर्ण करण्याचे आवाहन केले. तसेच गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेचे नियमित परीक्षण करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा विकसित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या बैठकीमध्ये जावडेकर म्हणाले, पर्यावरण, वन आणि हवामान परिवर्तन मंत्रालयाने व्याघ्र प्रकल्प आणि हत्ती प्रकल्पाच्या धर्तीवरच गंगेमधल्या डॉल्फिन संवर्धनासाठी विशेष कार्यक्रमाला तत्वतः मान्यता दिली आहे.