कोविड- 19 शी लढा देण्यासाठी आरसीएफने आणले नवे उत्पादन: हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए आधारित जेल
नवी दिल्ली, 11 जुलै : कोविड- 19 शी लढा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी राष्ट्रीय रसायन आणि खत, आरसीएफ या रसायन आणि खत मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमाने हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए जेल, ‘आरसीएफ सेफ्रोला’ आणले आहे.
हात स्वच्छ करण्यासाठीचे हे जेल, त्वचेसाठी उपयुक्त असणारे मॉइश्चरायझर आधारित आणि आयसोप्रोपील अल्कोहोल आणि कोरफड अर्क यांनी युक्त असल्याचे आरसीएफने म्हटले आहे. ताज्या लिंबाचा सुगंध असलेले हे जेल ई जीवनसत्वाने समृध्द आहे.
सहज बाळगता येणाऱ्या आणि न गळणाऱ्या बाटलीत 50 मिलीसाठी 25 रुपये आणि आणि 100 मिलीसाठी 50 रुपये किमतीला उपलब्ध आहे. कंपनीने यासाठी ही कमाल किरकोळ किंमत निश्चित केली आहे. आरसीएफ आपल्या देशव्यापी वितरण नेटवर्क मार्फत हे उत्पादन बाजारात आणणार आहे.
कोविड -19 महामारीच्या सध्याच्या काळात,बाजारपेठेत हॅन्ड सॅनीटायझरची मागणी असताना आरसीएफने, सुरक्षित आणि माफक दरातले हे उत्पादन आणून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपले छोटे योगदान दिले आहे.
आरसीएफचे नवे उत्पादन आयपीए जेल, ‘आरसीएफ सेफ्रोला’ जाहीर करताना आनंद वाटत असल्याचे आरसीएफचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस सी मुदगेरीकर यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरसीएफचे हे छोटे योगदान आहे. आरसीएफ ही मिनी रत्न कंपनी, देशातली आघाडीची रसायन आणि खत उत्पादक कंपनी आहे. युरिया, मिश्र खते, जैव खते यासह विस्तृत औद्योगिक रसायनांची निर्मिती आरसीएफ करते. उज्वला (युरिया ) आणि सुफला ( मिश्र खत ) या ब्रांड द्वारे ग्रामीण भागात कंपनीचे नाव घराघरात आहे. खतांबरोबरच चामडे, औषधनिर्माण यासह इतर औद्योगिक उत्पादनासाठी अनेक महत्वाच्या औद्योगिक रसायनाचे उत्पादनही कंपनी करते.