शून्य मशागत तंत्राने शेतीचा खर्च कमी व उत्पादन अधिक; शेतकरी व पर्यावरणासही लाभदायी- कृषिरत्न भडसावळे
मुंबई- “हवामान बदलाचं मोठं संकट शेतीवर येण्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जमीन नांगरट असून, शेतजमिनीसह पर्यावरणाला होणारे तीस टक्के नुकसान नांगरटीमुळे होते. उलटपक्षी शून्य मशागतीमुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे जतन व हवेतील कर्बाचे स्थिरीकरण होते. त्यामुळे शेतीतला खर्च कमी करून, उत्पादन वाढणारे तंत्र म्हणून शून्य मशागत ही शेतकरी आणि पर्यावरणालाही लाभदायी आहे, असे प्रतिपादन कृषिरत्न चंद्रशेखऱ भडसावळे यांनी केले.
‘शून्य मशागत शेती तंत्र’ या संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शून्य मशागत पद्धतीकडे वळावे यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा) वतीने ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भडसावळे यांच्यासह पोक्राचे प्रकल्प संचालक आयएएस विकासचंद्र रस्तोगी, पोक्राचे कृषिविद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी खरीप हंगामातील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांनी मागील तीन हंगामांपासून या तंत्राचा वापर करून कापूस, मका, झेंडू अशी विविध पिके यशस्वीपणे घेतली आहेत. संवाद विशेषज्ञ संग्राम जगताप यांनी शून्य मशागत शेती तंत्र वापरणारे शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
भडसावळे म्हणाले, “पर्यावरणाला नुकसान होईल अशी कोणती कृती न करता शून्य मशागतीमुळे उत्पादन वाढते, तसेच जमिनीत सतत वाफसा राहतो. यामुळे दोन हंगामांमध्ये वेळ दवडला जात नाही. पर्यावरणास मोठा हातभार लागत असल्याने शून्य मशागतीमुळे खऱ्या अर्थाने क्लायमेट स्मार्ट शेती होते.”
तण येणं हे भाग्याचं!
तणामुळे हवेतला कर्ब जमिनीत स्थिरावण्यास मदत होते. त्यामुळे सूक्ष्मजीवांची जैवविविधता वाढते. तसेच शून्य मशागत पद्धतीत तणनाशकांमुळे गांडुळांची संख्या वाढते. तण जागीच कुजल्याने त्यांच्या मुळांच्या खाद्यावर गांडुळ पोसले जातात, असा हजारो शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सोयाबीन, मक्यासह भाताच्याही शेतात गांडुळ पोसले जातात.
प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी म्हणाले, “शून्य मशागतीचे तंत्र हे सोपे व अत्यंत क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे. बाजारभाव आपल्या हातात नसला तरी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे हे शून्य मशागतीतून शक्य आहे. खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शून्य मशागत तंत्राचा वापर करून त्याचा लाभ घ्यावा.”
शून्य मशागत पद्धतीबाबत…
– एकदाच नांगरट करून कायमस्वरुपी गादी वाफे करा
– नांगरटीमुळे पर्यावरणाचं ३० टक्के नुकसान
– ट्रॅक्टर नांगरटीमुळे पाणी झिरपणं कमी झालं
– तण व्यवस्थापन तणनाशकांच्या साह्याने करावे
– चक्राकार पद्धतीने पिकांचा फेरपालट
……
पोक्रा प्रकल्पाबद्दल…
हवामानात होणारे बदल शेती, शेतीपुरक व्यवसाय आणि एकंदरीत संपूर्ण जीवनमानावर परिणाम करतात. यामुळे बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करण्यासाठी पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा खरीप हंगामात अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने पोक्राच्या वतीने गावनिहाय खरीप हंगाम नियोजन बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.