मुंबई, (अनिल चासकर) : चारकोप व गोराई परिसरात अरविंदो ही ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करणारी पहिलीच सोसायटी ठरली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक-18 च्या शिवसेनेच्या नगरसेविका संध्या विपुल दोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या वेळी सचिव संतोष कडू सह सामाजिक कार्यकर्ते विनायक शिंदे इतर सोसायटीचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बृहन्मुंबई महानगर पालिकेने 100 पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या इमारतींना ओला कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतःच करण्याचें आदेश दिले होते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अरविंदो सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खत बनविण्याचा खत प्रकल्प सर्वप्रथम सुरु करून चारकोप-गोराईमधील सोसायट्यांना चालना दिली. हा प्रकल्प उभा करण्याअगोदर सोसाटीचे सचिव संतोष कडू, कार्यकर्त्या प्रमिला कारंडे, अभिजित देसाई, नितीन कांबळी, रवी रामटेके व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्व सभासदांना ओला व सुख्या कचऱ्याचं वर्गीकरण व व्यवस्थापन याबाबत संगणकावर सादरीकरण करून मार्गदर्शन केले. मागील चार महिन्यांपासून सभासदांना ओला सुका कचरा वेगळा करण्याची सवय लावली व नंतरच कंपोस्टिंग च्या उपलब्ध सर्व पर्यायांचा अभ्यास करून सलग फिरते पिंप ही मानव संचालित पद्धत खत प्रकल्पासाठी अवलंबली.
पालिका गेले चार महिने चला सोडवूया कचऱ्याची समस्या व प्रदर्शन या माध्यमातून “शुन्य कचरा व्यवस्थापन”ची माहिती देत आहोत ,पदाधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केलें, असे आर / मध्य विभागाचे घ .क .व्य चे सहाय्यक अभियंता गणेश भाले यांनी सांगितले.
कचर्याची विल्हेवाट कशी लावायची ? या न सुटणाऱ्या समस्येशी पालिकेला झुंजावे लागत आहे. अनेक सोसायट्यांना मनपाकडून शुन्य कचरा अंतर्गत नोटीसाही पाठवल्या आहेत. म्हणूनच आम्ही पुढाकार घेऊन सर्वप्रथम प्रकल्प राबविला, असे अरविंदो सोसायटीचे सचिव संतोष कडू म्हणाले.