बिच वॉरीयर फाऊंडेशनतर्फे मानखुर्द येथील खाडीकिनारी स्वच्छता
मुंबई (शांताराम गुडेकर) : खाडी किनार्याचे संरक्षण करण्याच्या हेतूने स्वछता मोहीम यशस्वीपणे मानखुर्द येथील खाडीकिनारी रविवारी राबवण्यात आली. बिच वॉरीयर फाऊंडेशनच्या चिनु काँत्रा यांच्या संकल्पनेतून मानखुर्द विभागातील आगरवाडी गावातील तरूणांनी व स्थानिकांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे १०० आठवड्यात १०० किनारे स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती आगरवाडी गावातील महेश पाटील यांनी दिली.
वाढती वस्ती, त्यातच वाढणाऱ्या झोपडपट्टी परीसर, प्लास्टिक पिशव्यांनी भरलेले तुडुंब नाले, सोबत खारफुटी झाडीत उघड्यावर शौचास बसणारे लोक हे तर मोठे प्रश्न आहेतच. पण खारफुटीची झाडे तोडुन वाढत चाललेली वस्ती त्यामुळे लवकरच समुद्राचा फटका या विभागाला बसु शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे उपक्रम हे स्त्युत्य ठरत आहेत. या स्वच्छता मोहीमेत सहभागी तरुण-तरुणी यांचे अनेकांकडून कौतुकही करण्यात आले.