मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर जेलिफिश; समुद्राच्या पाण्यात जाणे टाळा
मुंबई : समुद्र चौपाटीच्या किनाऱ्यांवर सध्या पाण्यातून वाहून आलेले जेलिफिश आढळून आले असून त्याचा डंख विषारी असला तरी त्यापासून धोका नाही. मात्र, चौपाटीवर फिरायला गेल्यानंतर शक्यतो समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असे आवाहन मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी केले आहे.
मुंबई परिसरातील समुद्राच्या किनारपट्टीवर काही प्रजातीचे मासे प्रजननासाठी तसेच अन्नाच्या शोधात येतात. काही प्रजाती वजनाने हलक्या असल्याने वाहून समुद्र किनाऱ्यावर येतात. यामध्ये जेलीफिश, ब्लू जेली, मेडोसा, पोर्तीगीज मॅन ऑफ वार, पॉरपिटा आदींचा समावेश आहे. या प्रजातींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ते डंख करतात अथवा त्यांच्यामधील विषारी पदार्थांचा स्पर्श झाल्यामुळे शारीरिक वेदना होऊन शरीराचा भाग लाल होतो,बधीर होतो अथवा त्या भागात मुंग्या येतात. परंतु,यामुळे घाबरण्याचे कारण नाही. अशी घटना घडल्यास त्यावर व्हिनेगर चोळावे व थोडे गरम पाण्याने चोळल्यास वेदनेची तीव्रता हळूहळू कमी होते. अधिकच त्रास होत असल्यास जवळच्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.