मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांनी फळे, भाजीपाल्यावर अनावश्यक कीटकनाशके आणि हार्मोन्सचावा पर टाळावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे.यासंदर्भात कृषिमंत्री म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातून हिरवी मिरची निर्यात केली जाते. अलीकडे या निर्यात केल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीचे नमुने घेतले असता त्यात ‘फेंप्रोपॅथीन’ कीटकनाशकाचा अंश अधिक प्रमाणात दिसून आल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवाना आवाहन करताना कृषिमंत्री यांनी सांगितले की, फळ व भाजीपाल्यावर ‘ऑक्सिटोसीन’ सारखे हार्मोन्स आणि ‘मोनोक्रोटोफोस’ सारख्या कीटकनाशकांचा अनावश्यक वापर करू नये. याच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो आणि कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर राज्यातील निर्यातक्षम फळे, भाजीपाला यांचा योग्य दर्जा राखणे आवश्यक आहे, अन्यथा आयात करणाऱ्या देशांकडून प्रतिबंध लादले जातात, असेही फुंडकर यांनी सांगितले.
^^^^^^^^^^^^^
पर्यावरण दिनानिमित्त; सागरी किनारे स्वच्छता मोहीम
रत्नागिरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रत्नागिरीत सागरी किनारे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय पर्यावरण विभाग, वन मंत्रालय, समाजिक वनिकरण यांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग नोंदवला.
सागरी किनारा स्वच्छता व प्लास्टिक कचर्याच्या निर्मुलनासाठी पांढरा समुद्र येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहीमेत विविध कंपन्यांनी, आयटीआयचे मुलांनी सक्रिय सभग नोंदवून स्वच्छता मोहिम यशस्वी केली. सुमारे दीड ते दोन टन कचरा गोळा केला. केंद्र शासनाने निवडलेल्या किनार्यांमध्ये गणपतीपुळे आणि मिर्या किनार्याचा समावेश होता. समाजिक वनीकरण आणि वन विभागाकडून पंधरा मे पासून ही स्वच्छता मोहिम सुरू आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयाने विद्यार्थी, निसर्ग प्रेमी, विविध कंपन्या, सेवाभावी संस्था सभागी झाल्या. महाविद्यालये, समाजिक संस्था आदी त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज पांढरा समुद्र किनार्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मोठ्या प्रमाणात समुद्र किनार्यावर साचलेले प्लास्टिक, बाटल्या, कचरा, थर्माकॅल, ओला कचरा आदी गोळा करून किनारा स्वच्छ करण्यात आला.
^^^^^^^^
पोगो आणि भामलाने दिला प्लास्टीक मुक्तीचा संदेश
मुंबई : पर्यावरण सुरक्षेचा प्रसार करण्यासाठी पोगो या वाहिनीने भामला फाउंडेशनच्या सहयोगाने जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला. यावेळी पोगो किड्स चैनल पर्यावरण सुरक्षेचे अभियान राबविले. प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली.
या अभियानाला २५० लहान मुले आणि बॉलीवुडमधील प्रसिद्ध व्यक्तींचे समर्थन मिळाले. लोकप्रिय कार्टून्स, उत्साही लहान मुलांसोबत आणि भामला फाउंडेशनचे संस्थापक आसिफ भामला सोबत शान, अरमान मलिक, सिद्धांत कपूर, तनिशा मुखर्जी, शामक डावर आणि आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते.
भीम, चुटकी, टॉम एंड जेरी या कार्टून पात्रांनी टिक टिक प्लास्टिक या गाण्यावर विशेष नृत्य प्रदर्शनच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर करू नका, असा संदेश दिला.
^^^^^^
धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला लाटांचा तडाखा
रत्नागिरी :
अमावास्येनंतरच्या उधाणाचा फटका रत्नागिरी जवळच्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला बसला. आज शनिवार(ता.16) किनाऱ्याला जवळपास चार ते पाच मिटर उंचीच्या लाटा येथून धडकत होत्या. लाटांचा हा तडाखा पंधरामाड, मिऱ्या आणि आलावा इथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला बसलाय. गेल्या वर्षी पाऊस आणि त्यावेळी आलेल्या उधाणामुळे इथला बंधाऱ्याचा भाग वाहून गेला होता. जवळपास १३०० मिटर लांबीचा हा बंधारा आहे. गेल्या वर्षीचा अनुभव पाहून वाहून गेलेल्या ठिकाणी मोठाली दगडींचा भराव टाकण्यात आला होता. मात्र पाऊस नसताना या लाटांच्या तडाख्यांनी बंधाऱ्याचा काही भाग पुन्हा वाहण्यास सुरवात झालीय. सध्या समुद्राच्या अजस्त्र लाटा या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यावरून थेट नागरीवस्तीत घुसू पहातायत. त्यामुळे सध्या इथले नागरिक सुद्धा भयभीत झालेत.पंधरामाड परिसरातला धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा काही भाग लाटांच्या माऱ्यामुळे वाहून गेलाय. समुद्राच्या उधाणापासून नागरिकाच्या वस्तीचे रक्षण व्हावे म्हुणन हा बंधारा बांधला गेला होता. सध्या उधाणाच्या लाटा या बंधाऱ्यावरून नागरीवस्तीत घुसू पहातायत. सध्या या लाटा बंधाऱ्यावरून उसळून थेट घराला लागून असलेल्या बागेत घुसल्या, त्यामुळे अनेक घरांच्या मागे असलेल्या विहिरीत हे उधाणाचं पाणी घुसलंय. त्यामुळे सध्या जीव मुठीत धरून इथले ग्रामस्थ रहातायत. रात्रीपासून उधाणाच्या परिस्थितीकडे इथले ग्रामस्थ लक्ष्य ठेवून आहेत. त्यामुळे पाऊस वाढला तर उधाणाचा मोठा फटका इथल्या नागरी वस्तीला बसू शकतो.
^^^^^^^
जाळ्यात अडकलेल्या 4 कासवांना तरूणांनी दिलं जीवदान
रत्नागिरी : गुहागर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या 4 कासवांना तेथील स्थानिक तरूणांनी जीवदान दिलं आहे. हि चारही कासवं किना-यावर जाळ्यात अडकलेलं होती. सकाळी समुद्र किना-यावर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या प्रसाद कचरेकर, चिन्मय कचरेकर, अलकेश भोसले, दीप कचरेकर आणि अमोल नरवणकर या तरूणांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचं दिसलं. त्यांनी ते जाळं समुद्रातून किना-यावर खेचत आणलं तर त्यामध्ये कासव असल्याचं निदर्शनास आलं. त्या कासवांचे पाय जाळ्यात अडकले होते. त्यांना त्यातून सुटता येत नव्हतं. या तरूणांनी चारही कासवांच्या पायातील जाळं बाजुला केलं आणि या कासवाला कुठे जखम वैगरे झालीय का याची पहाणी केली आणि त्यानंतर त्यातील तीन कासवांना पुन्हा समुद्रात सोडून दिलं. तर एका जखमी कासवाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. ऑलिव्ह रेडली या जातीची हे चारही कासव होती त्याचं वजन सुमारे 60 किलोच्या आसपास होतं तर लांबी तीन फुटापर्यंत होती. गुहागर येथील किनारपट्टीवर फिणा-या या तरूणांनी या चारही कासवांना जीवदान दिलंय..कोकणच्या किनार पट्टीत मोठ्या प्रमाणावर अंडी घालण्यासाठी जगातील दुर्मिळ ऑलिव्ह रेडली जातीचं कासवं येत असतात. मात्र ही चारही कासवं मच्छिमार यांनी लावलेल्या जाळ्यात अडकली व वाहत ती गुहागरच्या किनाऱ्यावर लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
^^^^^^^
औद्योगिक विभागातील कचऱ्याला एमआयडीसीच जबाबदार ?
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत ती 27 गावे समाविष्ट झाली असली तरी तेथील नागरिकांच्या समस्या चौपट वाढत आहेत. गावागावात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत असून शहराजवळ असणाऱ्या औद्योगिक विभागातील परिस्थिती जैसे थे अशीच आहे. मुख्य म्हणजे औद्योगिक विभागात एमआयडीसी प्रशासनाच्या अंधाधुंध कारभारामुळे कचऱ्याचे समस्या वाढत आहते. नालेसफाई करूनही नाले पुन्हा कचऱ्याने तुडुंब वाहत आहेत याला जबाबदार एमआयडीसी आहे असा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी करीत आहेत. मात्र आम्हीच पूर्वी नाले सफाई पूर्णपणे करीत होतो असे वक्तव्य एमआयडीसी अधिकारी करीत आहेत.
त्या 27 गावांपैकी भोपर, कोळे, निळजे, काटई, सोनारपाडा, दावडी आदी परिसरातील नालेसफाई काम सुरु आहे. या सफाई कामासाठी 70 कामगार काम करीत आहेत. या कामासाठी एक पोखलन आणि चार जेसीपी माध्यमातून 7 कि.मी. मोठ्या नाल्यांची सफाई होत आहे अशी माहिती स्थानिक लोकप्रतिनिधीकडून मिळत आहे. नालेसफाई करूनही पुन्हा नाल्यात कचरा पडल असल्याने नाले सफाई करून फायदा होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. नाले सफाई करतांना दरोरोज सुमारे 20 ट्रक कचरा निघत असून असे काम गेले अनेक दिवस सुरु आहे.
परंतु असे असले तरी औद्योगिक विभागात नाल्यांची सफाई होताना अनेक अडचणी येत आहेत. नाल्यांमधून मोठ्या केबलचे जाळे आहे. शिवाय नाल्यांवर टाकण्यात आलेले पुल नाल्यातील कचऱ्याला अडवणूक ठरत आहेत. काही मोठ्या नाल्यात मोठ दगड असून ते माणसे काढू शकत नाहीत आणि नाल्यातून कचरा काढण्यास जेसीपी तसेच पोखलणचा वापर करता येत नाही. नाल्यात केमिकल मिश्रित पाणी असल्याने मजूर लावून कचरा काढता येत नाही अशी मोठी समस्या आहे. मुळात एमआयडीसीच्या सद्य परिस्थितीमुळे काम करणे अवघड होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी करीत आहेत. याबाबत एमआयडीडी अधिकारी दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, नालेसफाई हे काम पालिका करीत असून आमचा काही संबध नाही. आम्ही याच परीस्थितीत पूर्वी नाले सफाई करीत होतो. मोठ्या केबल्स आणि पूल हे पूर्वीपासून तसेच असल्याने यावर काहीच बोलू शकत नाही. परंतु नालेसफाई करतांना हँड्ग्लोज आणि गमबूट वापरून नालेसफाई केली पाहिजे अशी पुष्टी जोडली.
^^^^^^^
करंबवणे खाडीतील पुन्हा एकदा मृत माशांचा खच
रत्नागिरी :
चिपळूण तालुक्यातील करंबवणे खाडीतील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण गेल्या दोन दिवसांपासून किनाऱ्याला मृत मासे दिसून येत आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट आहे. तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत लोटे येथील कंपन्यांचे प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया न करताच खाडीत सोडण्यात आल्याने मासे मृत झाल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे.
एकेकाळी मासेमारीसाठी समृद्ध असा पट्टा म्हणून करंबवणे खाडीची ओळख होती. नदीकाठच्या अनेक मच्छिमार कुटुंबांचा उदरनिर्वाह या मच्छी व्यवसायावर चालत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून करंबवणे खाडीत लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे मासे मृत होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. खाडीत मासे मरण्याच्या घटना घडत असल्याने इथल्या मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पण अलीकडे कित्येक वर्षांनंतर करंबवणे खाडीत वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळू लागले होते. विशेषतः कोळंबीहि मोठ्या प्रमाणात मिळू लागली होती. वेगवेगळ्या प्रकारची मासळी मिळत असल्याने मच्छिमार सुखावले होते. पण मासे मृत होण्याच्या या घटनेने मच्छिमारांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. कोळंबी, पालू, खरबा अशी वेगवेगळ्या प्रकारची मृत मच्छि पाण्यावर तरंगताना दिसत आहे. गोवळकोट ते थेट कररंबवणे, बहिरवलीपर्यंत हिच स्थिती आहे.
दरम्यान स्थानिक ग्रामस्थानी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जावून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी खाडीची पाहणी करत घटनेचा पंचनामा केला आहे.
दरम्यान वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे प्रशासनाला धडा शिकविण्यासाठी मच्छिमारांनी पुन्हा एकत्र येण्याची आज गरज आहे.