पर्यावरणप्रेमी शिवसेना; मरोळ परिसर हिरवागार करण्याचा निर्धार, ११०० रोपांची लागवड
मुंबई, (निसार अली): सिमेंट-काँक्रिटचे वेढलेला अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसर विविध प्रकारच्या फळझाडांनी हिरवागार करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मरोळ येथे महापालिकेच्या मैदानात वृक्षारोपणाचा भव्यदिव्य कार्यक्रम घेण्यात आला.
वृक्षारोपण संकल्पनेचे आयोजन शिवसेना संघटक कमलेश राय यांनी केले. पालिकेच्या मैदानात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत ११०० नागरिकांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी अकराशे रोपे लावली. या कार्यक्रमाला जवळपास दोन हजार नागरिक उपस्थित होते. या मैदानात जांभूळ, फणस, आंबा, चिंच, नारळ, आवळा यांसह वड, पिंपळ, बकुळ, ताम्हण, पिवळा बहावा, कदंब आदी रोपे लावण्यात आली. महापौर विश्वनाथ महाड़ेश्वर, आमदार रमेश लटके, संघटक कमलेश राय, महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी, वसंत ओएसीस सोसायटीचे सदस्य, विविध सामाजिक संघटना, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.