मासेमारी हंगाम संपुष्टात, नौका किना-यावर बंदी कालावधी ६१ दिवसाचा, मत्स्य विभाग अलर्ट
रत्नागिरी, प्रतिनिधी : किनारपट्टी भागात १ जूनपासून मासेमारी बंदी लागु करण्यात आली आहे. पुढील दोन महिने मासेमारी व्यवसाय बंद राहणार आहे. केंद्र शासनाच्या निर्णयाला जिल्ह्यातील मच्छिमारांनी प्रतिसाद दिला असून शंभर टक्के मच्छिमारांनी मासेमारी बंद ठेवत आपल्या नौका किना-यावर ओढल्या आहेत. बंदी कालावधीत अनधिकृत मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्य विभागही सतर्क झाला आहे.
पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात बिगर यांत्रिक किंवा यांत्रिक पद्धतीने मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात येते. सर्व साधारणपणे १० जून दरम्यान कोकणात पावसाला सुरूवात होते. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सक्रीय होतो. यावर्षी मात्र पावसाचे आगमन लांबणीवर पडण्याची चिन्हे आहे. मे महिन्यात आलेल्या तोक्ते वादळाचा परिणाम पावसाच्या आगमनावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जुनच्या पंधरवड्यापर्यंत पाऊस कोकणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. अशावेळी मासेमारी बंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी मत्स्य विभागही अलर्ट झाला आहे.
पावसाळयापूर्वी प्रजननासाठी मासळी किना-यालगत येऊन अंडी देते. ही मासळी मिळवण्यासाठी अनेकदा मच्छिमार समुद्रात धाव घेतात. परिणामी प्रजनन प्रक्रिया योग्य पध्दतीने होत नसल्याने मागीन काही कालावधीपासून मच्छिमार हंगाम तोट्याकडे चालला आहे. केरळसह अन्य किनारपट्टी भागात १ जूनपासून मासेमारी बंदी लागु करण्यात आली आहे. या कालावधीत या भागातील मासेमारी व्यवसाय बंद असल्याने महाराष्ट्रातही १ जूनपासून मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील समुद्र किना-यावरील सर्व बंदरामध्ये १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर शासनाकडूनच बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाला मच्छिमारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरकरवाडा हे सर्वात मोठे बंदर असून जिल्हाभरात लहान आणि मध्यम स्वरूपाची अशी सुमारे ४० बंदरे आहेत. या सर्व बंदरामध्ये मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या मासेमारी नौका किना-यावर आणण्याचे काम सुरू आहे. २ हजार ५९८ नौका आहेत. यामध्ये सर्वाधिक २ हजार ४५० नौका यांत्रिक असून उर्वरित २०० नौका बिगर यांत्रिक आहेत. यापैकी ८० टक्के नौका किनाºयावर आणण्याचे काम पूर्ण झाले आहे.