खाडीजवळ असलेल्या कन्नमवार नगरात कोल्हा शिरला; वनविभागाने पकडले, संरक्षक जाळ्या लावण्याची मागणी
मुंबई : खाडीजवळ वसलेल्या विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे रविवारी कोल्हा शिरला. यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ विक्रोळी ते मुलुंडपर्यंत रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या बसवाव्यात अशी मागणी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड जॉय झेवीयर यांनी केली आहे.
कन्नमवार नगराला लागूनच खाडी आहे. या ठिकाणी तिवरांची झाडे मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे कोल्हा या प्राण्याचा अधिवास येथे आहे. तिवरांच्या वनातून भरकटत तो मानवी वस्तीत एखाद्या भक्ष्याच्या शोधात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांना कोल्हा दिसल्यानंतर विक्रोळी पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाच्या पथकाने पाच तासांच्या अथक प्रयत्नाने कोल्ह्याला सुरक्षित पकडले.
दुपारी 12 च्या सुमारास इमारत क्रमांक 79 च्या मागील बाजूस कुत्रे जोरजोरात भुंकत होते. कुत्रे कोल्ह्याच्या पाठीमागे लागले होते. त्यामुळे भेदरलेला कोल्हा सुरक्षा भिंतीवर चढला. कुत्रे का भुंकत आहेत, म्हणून स्थानिकांनी निरीक्षण केले असता, कोल्हा असल्याचे आढळले आणि एकच खळबळ उडाली.