गणेशोत्सवात द्या ग्रीन मोदकांचा प्रसाद; साजरा करा पर्यावरणस्नेही उत्सव
मुंबई, ( निसार अली) : ‘एक बीज, एक सावली’ या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या वतीने आरे कॉलनीमध्ये युनिट नंबर 17 इथे विविध बियाणांचा वापर करून मातीचे मोदक बनविण्यात आले आहेत. हे मोदक प्रसाद म्हणून भाविकांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिन रहाटे यांनी दिली आहे. गणेशभक्तांनी हे मोदक घेतल्यानंतर ते घरातील कुंडी किंवा अंगणात लावू शकतात. यामुळे उत्सव पर्यावरणस्नेही होण्यास मदत होणार आहे.
गणेशोत्सवाच्यावेळी मिठाईऐवजी प्रसाद देण्यासाठी ग्रीन मोदक हा उपक्रम राबवला जाणार आहे. उत्सव काळात अधिकाधिक नागरिक आणि मुंबईतील गणपती मंडळांपर्यंत ग्रीन मोदक उपक्रम पोहोचावा, यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. ग्रीन मोदकचा मोबदला म्हणून शालेय वस्तू घेण्यात येणार असून या वस्तू आरे कॉलनीमधील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
या उपक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी पाठिंबा द्यावा तसेच वृक्षारोपण करावे, असे आवाहनही संस्थेने केले आहे.
संपर्क : संजीव शामनथुला – 9820056756, सचिन रहाटे – 9820648608