हवा प्रदूषण निरीक्षण प्रदर्शन यंत्रणा उपयुक्त सिध्द होईल : उद्योग मंत्री सुभाष देसाई
रत्नागिरी, प्रतिनिधी : लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने येथे कार्यान्वित करण्यात आलेली हवा प्रदूषण निरीक्षण प्रदर्शन यंत्रणा नक्कीच उपयुक्त सिध्द होईल, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला.
लोटे एमआयडीसी परिसरात बसविण्यात आलेल्या हवा प्रदूषण निरीक्षण प्रदर्शन यंत्रणेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, सीईटीपी चे चेअरमन सतीश वाघ , सीईटीपी चे व्हाईस चेअरमन महादेव महिमान, अधीक्षक अभियंता श्री. वानखडे, लोटे सरपंच चंद्रकांत चाळके, घाणेखुंट सरपंच अंकुश काते, प्रशांत पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्योग मंत्री श्री.देसाई म्हणाले की, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये बसविण्यात आलेल्या या यंत्रणेमध्ये प्रत्येक दहा मिनिटांनी हवेचा दर्जा तपासून वाचन होणार आहे. ही यंत्रणा मुंबई येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात आलेली असल्यामुळे रीडिंग मध्ये कोणतेही गैर आढळल्यास संबंधितांना जाब विचारला जाईल व संबंधितांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. तसेच प्रदूषणाचे नियंत्रण सांभाळण्यासाठी ही यंत्रणा नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, या परिसरातील जनतेने येथे औद्योगिक क्षेत्रासाठी जागा उपलब्ध करून दिली असून त्यांना चांगली हवा व पाणी मिळाली पाहिजे, ती आपली सर्वांची जबाबदारी आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र, औद्योगिक क्षेत्र लोटे यांनी हा चांगला उपक्रम राबविला असून अशा प्रकारची यंत्रणा राज्यामध्ये इतर सर्वत्र राबविण्याबाबत निर्देश देण्यात येतील.
सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेच्या मार्फत करण्यात येणाऱ्या मदतीबाबत यावेळी मंत्री महोदयांनी कौतुक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते टु-वे स्कँडा ऑटोमॅटिक सिस्टीम चे लॅपटॉप च्या साह्याने डेमो प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच संस्थेच्या माध्यमातून गोवळकोट – भोईवाडा येथे अतिवृष्टीने बाधित झालेल्यांना त्यांच्या हस्ते मदतही देण्यात आली.
या कार्यक्रमाला येथील उद्योजक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.