प्रदूषणाच्या तक्रारींबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश : पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. १२ : राज्यातील प्रदूषणाच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य सुधाकर अडबाले यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या आठ नंबरच्या संचामध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. नऊ नंबरचा संच बंद करण्यात आला असून, आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच तो पुन्हा सुरू करण्यात येईल. वीज केंद्रातील इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर तपासून आवश्यक दुरुस्त्या करण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून राखेचे उत्सर्जन नियंत्रित राहील.
परळी औष्णिक वीज केंद्राच्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असून. नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
राखेची वाहतूक आच्छादित (झाकून) करावी आणि त्यावर पाण्याचा फव्वारा मारला जावा, असे सक्त आदेश दिले आहेत. हे नियम न पाळणाऱ्या उद्योगांवर त्वरित कारवाई करण्यात येईल. स्थानिक नागरिकांनी जर कोणतीही नियमभंगाची तक्रार केली, तर प्रशासन तत्काळ पावले उचलणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
चंद्रपूर टीपीएस (Thermal Power Station) मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान बसवण्यात येत आहे. डिसेंबर 2028 पर्यंत ही नवीन यंत्रणा कार्यान्वित होईल. हे तंत्रज्ञान बसवल्यानंतर प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रामुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत. नियमांचे पालन होत नसल्यास दंड आणि कारवाई केली जाईल. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पर्यावरण सुधारण्यासाठी नवीन उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.