२६ जुलै जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळला जातो; त्यांचे संवर्धन होणे महत्वाचे आहे
मुंबई : २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळला जातो. खारफुटीचे महत्व लक्षात घेता पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे संवर्धन, संरक्षण व्हावे, या उद्द्शाने युनेस्कोने २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी संवर्धन दिन म्हणून साजरा करण्याचे जाहिर केले. युनेस्कोने २०१५ साली एका परिषदेत याबाबत निर्णय घेतला. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये हा दिवस आधीपासूनच साजरा केला जातो. खारफुटी किंवा कांदळवने वाढावी म्हणून जगभर प्रयत्न केले जात आहेत.
ही झाडे पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असून नैसर्गिक संरक्षक भिंत म्हणून कार्य बजावतात. त्यांना तिवरं, कांदळ असेही म्हटले जाते. खार्या जमीनीत फुटणारी झाडे असेही यांना म्हणता येईल.
या झाडांचे महत्व :
कार्बन डायऒक्साइडचे शोषण
खारफुटीच्या झाडांमध्ये अपायकारक कार्बन डायऒक्साइड शोषण करण्याची क्षमता इतर झाडांपेक्षा 4 पट जास्त असते. ही झाडे जमीन आणि खाडी किनार्यांमध्ये असतात. झाडांमुळे पाणी आणि जमिनीचा समतोल राखला जातो. यामुळे शुद्ध प्राणवायू मिळण्यास मदत होते.
आपत्तीपासून बचाव होतो
पूरपरिस्थिती आणि मोठ्या वादळांपासून ही झाडे संरक्षण करतात. झाडांमुळे जमिनीच्या भोवती तटबंदी निर्माण होते. झाडांची मुळे जमीनीत खोलवर जातात आणि गाळ किंवा जमीनीला धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीवर पाण्याचा मारा कमी होतो. 2005 साली मुंबई मध्ये पूर आल्यानंतर लोकांना खारफुटीच महत्व लक्षात आले होते.
जीवजीवाणूंचे वसतीस्थान
खारफुटीच्या झाडाखालच्या पाण्यात छोटे छोटे जीव जीवाणू आढळतात. खेकडे, मासे, कोळंबीचे प्रजजन आणि अन्न देणारे स्थान म्हणून कांदळवनांकडे पाहिले जाते. या झाडांमुळे मासेमारी करणे अधिक सोयीचे होते. मुंबईचा मोठा परिसर खारफुटीच्या झाडाने व्यापला आहे. गेल्या 1 ते दिड दशकामध्ये 40% झाडे नष्ट झाली आहेत. ती वाढवणे गरजेचे आहे.