कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी स्थानिकांनी पुढाकार घेण्याची गरज : सतीश लळीत
कातळशिल्पे नष्ट होण्याचे प्रमाण चिंताजनक
कणकवली, दि. २४: कातळशिल्पे हा प्राचीन मानवी वारसा असुन त्याच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने चिरेखाणी, रस्ते आदि कारणांमुळे ती नष्ट होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी कातळशिल्पे असलेल्या परिसरातील ग्रामपंचायती, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, जागरुक नागरिक यांनी पुढाकार घेऊन आपापल्या परिसरात जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कातळशिल्प अभ्यासक व ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ ग्रंथाचे लेखक सतीश लळीत यांनी कणकवली येथे केले.
कणकवली कॉलेजमधील सामाजिक विज्ञान मंडळाने आयोजित केलेल्या ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ या विषयावरील सादरीकरण व व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. चौगुले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. राजेश साळुंखे, इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. सोमनाथ कदम, भुगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. एल. राठोड उपस्थित होते. श्री. लळीत यांनी सुमारे दीड तासाच्या सादरीकरणामध्ये पुरातत्वशास्त्र, त्रियुग सिद्धांत, पाषाणकला याची तोंडओळख करुन दिली आणि कातळशिल्पे म्हणजे काय, ती कोठे आढळली आहेत, त्यांचा संभाव्य कालावधी व खोदण्याचा उद्देश यावर विवेचन केले. व्याख्यानाच्या सुरुवातीला रोपटे आणि गुलाबपुष्प देऊन डॉ. चौगुले यांनी श्री. लळीत यांचे स्वागत केले. श्री. लळीत यांनी त्यांना आपला ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हा ग्रंथ भेट दिला. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरेही झाली.
श्री. लळीत पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यात हिवाळे, कुडोपी, किर्लोस, खोटले, आरे, वाघोटण, दाभोळे अशा सुमारे सोळा ठिकाणी जांभ्या दगडाच्या सड्यांवर कातळशिल्पे आढळली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्राचीन काळातील मानवी संस्कृतीचा विकास आणि पुरातत्वशास्त्र यादृष्टीने ही कातळशिल्पे खुप महत्वाची आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेला कातळशिल्पांचा हा प्राचीन ठेवा जपणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. तथापि, याबाबत पुरेशी जनजागृती नाही. या कातळशिल्पांचे महत्व माहीत नसल्याने त्याकडे सर्वसामान्यांचे दुर्लक्ष होते. शासनस्तरावरही बरीच उदासिनता दिसते. कित्येक ठिकाणी चिरेखाणींमध्ये हा प्राचीन ठेवा नष्ट झाला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
हिवाळे येथील धनगरसड्यावरील कातळशिल्पांचा शोध मी आणि माझे बंधु प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी लावला, त्याला ६ मे २०२१ रोजी वीस वर्षे पूर्ण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पां चिरेखाणींमघ्य्चा हा पहिला शोध होय. गेल्या वीस-एकवीस वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिवाळेनंतर कुडोपी, वानिवडे, वाघोटणसह अनेक गावांमधील कातळशिल्पे विशेषत: हौशी अभ्यासकांनी उजेडात आणली. यानंतर २०१२ साली कुडोपी (ता. मालवण) येथील कातळशिल्पांचा सविस्तर अभ्यास केला. राष्ट्रीय स्तरावरील पुरातत्व परिषदांमध्ये याबाबतचे शोधनिबंध सादर केले आहेत. मी केलेल्या अभ्यासानुसार ही कातळशिल्पे अश्मयुगातील असून त्यातही नवाश्मयुगातील आहेत, असे मत मांडले. बदामी (कर्नाटक) येथील राष्ट्रीय रॉक आर्ट परिषदेत २०१२ मध्ये मी जेव्हा याबाबतचा शोधनिबंध सादर करुन याचा कालावधी इ.स.पू. सहा ते १० हजार वर्षे असा असण्याची शक्यता व्यक्त केली, तेव्हा उपस्थित अनेक पुरातत्वज्ञांनी याला दुजोरा दिला. याबाबतचा शोधनिबंध मुंबई विद्यापीठात सादर केला, तेव्हाही माझ्या मताशी ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञांनी सहमती दाखवली. काही पुरातत्वशास्त्रज्ञांच्यामते ही कातळशिल्पे इ.स.पुर्व वीस हजार ते दोन हजार वर्षे या काळात वेगवेगळ्यावेळी खेदण्यात आली आहेत, असे श्री. लळीत म्हणाले.
या सर्व पुरातत्व स्थळांचे संवर्धन, आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राला एक नवा आयाम मिळेल. कातळशिल्पांचा अधिक शास्त्रशुद्ध अभ्यास झाला तर कोंकणातील मानवी अस्तित्वाच्या प्रवासावर नवा प्रकाश पडू शकेल. पण यासाठी शासनस्तरावर आवश्यक असलेली राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती, स्थानिक जनतेचा सहभाग आणि रेटा निर्माण होऊन हे प्रत्यक्षात घडेल का, हा कळीचा प्रश्न आहे. या सर्वांच्या प्राधान्यक्रमात हा विषय कोणत्या क्रमांकावर असेल, हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत आशावादी रहायला हरकत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी विद्यार्थ्यांना इतिहास या विषयाचे महत्त्व सांगितले व युवापिढीने हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे, असे मत व्यक्त केले. डॉ. सोमनाथ कदम यांनी प्रास्ताविक केले. वक्त्यांचा परिचय प्रा. विनया रासम यानी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ. मारोती चव्हाण यांनी व आभार प्रदर्शन डॉ. तेजस जयकर यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. सीमा हडकर, प्रा.सत्यवान राणे, प्रा. एस. आर. जाधव, डॉ. भिकाजी कांबळे, प्रा. सचिन दर्पे, कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.