रत्नागिरी : भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली आहे. आज सकाळी बिबट्याने अशोक तुकाराम कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावर झडप घातली. मात्र हा कुत्रा निसटला आणि पळत थेट कांबळे यांच्या शौचालयात घुसला. कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील शौचालयात घुसला. मात्र, त्याचवेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्याने कुत्रा व बिबट्या आतमध्ये अडकले होते. कांबळे जेव्हा शौचालयासाठी जण्यासाठी आले तेव्हा त्यानी दरवाजा उघडला. आतमध्ये बिबट्या आणि कुत्रा दिसले. त्यांनी तातडीने दरवाजा पुन्हा बंद करून वन विभागाशी संपर्क केला. घटनेची माहिती समजताच वन विभाग तातडीने पिंजरा घेऊन घटनास्थळी पोहचले. शौचालयाचा वरील भाग फळ्या ठोकून बंद केला आणि शौचालयाच्या तोंडावर पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केले. बिबट्या चार वर्षांची मादी बिबट्या असून, वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले..