रत्नागिरी, (आरकेजी) : घरात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले खरे, परंतु काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तीन ते चार दिवस उपाशी असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. गुहागर तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोड़े यांच्या घराच्या पड़वीत बिबट्या शिरला होता.
पहाटे कोणीतरी मोठ्याने ओरडत असल्याचा आवाज रमेश यांना ऐकू आला. ते बाहेर आले. मात्र घराच्या पडवीत आल्यावर त्यांना बिबट्या बसलेला दिसला. त्यांनी लगेचच घराचा दरवाजा बंद केला आणि इतरांना सांगितले. वन विभाग व पोलिसांना कळवल्यानंतर दोन्ही विभाग घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. बिबट्या घरात शिरल्याची वार्ता गावात पसरली. बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. मात्र हा बिबट्याचा बछडा यावेळी खूप थकला असल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. पाच ते सहा महिन्यांची मादी बिबट्या होती.